पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे भीम अनुयायांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2017

पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे भीम अनुयायांचे हाल


मुंबई । अजेयकुमार जाधव -
देशाच्या किनारपट्टीवरील राज्यांना आणि शहरांना ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. या वादळाचा तडाखा मुंबईला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१ वा माहापरिनिर्वाण दिन संपन्न होत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सोयी सुविधा देताना या वादळाची दखल घेण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे.

ओखी चक्रीवादळाचा तडाखा किनारपट्यावरील राज्यांना बसला आहे. मुंबईलाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असून याचा ४ ते ७ डिसेंबर दरम्यानपरिणाम जाणवणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मुंबईला ज्या दिवसात ओखी वादळाचा परिणाम जाणवणार होता त्याच दरम्यान मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असतो. त्यासाठी पालिकेकडून दिड कोटी रुपये रुपये खर्च करून सोयी सुविधा पुरण्यात येतात. याहीवर्षी अश्याच सोयी सुविधा पुरवण्यात आल्या. मात्र वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारपासून पडणाऱ्या पावसात चैत्यभूमीवर आलेले हजारो भीम अनुयायी भिजत होते. अनेकांनी बाजूच्या इमारती, दुकाने, रेल्वे स्टेशनचा आसरा घेतला होता.

भीम अनुयायांसाठी पालिकेने दादर परिसरातील शाळा राहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र या शाळांना पालिकेकडून काही कळविण्यात आले नसल्याने अनेक शाळांनी आपली जागा भीम अनुयायांना पावसादरम्यान आपल्या शाळेमध्ये आसरा घेण्यास नकार दिला. मंगळवारी सकाळी भर पावसात हजारो भीम अनुयायी स्टेशनवर, रस्त्यावर, दुकानाच्या बाहेर आसरा घेतलेले होते. तसेच शिवाजी पार्कमधील बांधण्यात आलेल्या मंडपातही पावसामुळे चिखल झाला होता. यामुळे अनुयायांना चिखलातच राहावे लागत होते. हे चित्र पाहिल्यावर भारिप बहुजन महासंघाचे प्रतीक कांबळे आणि रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारत त्वरित या अनुयायांची शाळांमधून सोय करण्यास सांगितले.

यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेस्टशी संपर्क साधून २० बसेसमधून शिवाजी पार्कमधील अनुयायांना बाजूच्या शाळांमध्ये हलवले. यादरम्यान शिवाजी पार्कमधील मंडप उभारताना छतावर प्लॅस्टिक टाकण्याची अट टाकण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने मंडपाच्या छतावर प्लास्टिक न टाकल्याने संपूर्ण मंडपात चिखल झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी कंत्राटदाराला ज्या सुविधा लागतील त्या द्या आम्ही तुमची जी काही बिले होतील ती देऊ पण लोकांना त्रास होता काम नये असे सांगितले. मात्र आबासाहेब जऱ्हाड निघून गेल्यावर मंडप उभारणार कंत्राटदार निघून गेला तो काही परत आलेला नाही.

पालिकेने मंडप बांधण्याचे कंत्राट देताना छतावर प्लास्टिक टाकण्यास सांगितले होते. पालिकेने दिलेल्या कंत्राटाचे कंत्राटदाराने उल्लंघन केले आहे. यामुळे हजारो अनुयायांना त्याचा त्रास सहन करावा लागला असल्याने कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी प्रदीप कांबळे व रमेश जाधव यांनी केली आहे. तसेच पालिकेने या कंत्राटदाराचे एकही बिल पास करू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही शिवाजी पार्कला भेट देऊन अनुयायांना झालेल्या त्रासाची माहिती घेतली व पालिका अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी केली.

पालिकेने शाळांमध्ये सोय केल्याचे माहित नाही -
शिवाजी पार्क परिसरात दरवर्षी राहण्याची व्यवस्था केली जाते. यावर्षी आम्ही नेहमी प्रमाणे शिवाजी पार्क मध्ये आलो. इकडे पाऊस पडत असल्याने चिखल झाला आहे. कोणीही आम्हाला शाळांमध्ये राहण्याची सोय केल्याचे सांगितले नाही. म्हणून आम्ही शिवाजी पार्कात चिखलात रात्र काढल्याचे अनुयायांनी सांगितले. तर आम्हाला काही कार्यकर्ते शाळांमध्ये घेऊन गेले. शाळेत गेल्यावर आम्हाला पालिकेने असे कळविले नसल्याचे सांगितले. यावर कार्यकर्त्यांनी पालिकेने जाहीर केलेल्या शाळांची यादी शाळा प्रशासनाला दाखवल्यावर शाळेंमध्ये अनुयायांना राहण्यास मिळाले असल्याची माहिती काही अनुयायांनी दिली आहे.

Post Bottom Ad