मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या सेवा-सुविधांबाबत जनसंपर्क विभागाने संकलित केलेल्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावरील महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील स्वागत कक्षात सकाळी करण्यात आले.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनुयायांना प्राथमिक स्वरुपात माहिती पुस्तिकेचे वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सदर पुस्तिका ही ४४ पानांची असून अनुरुप अशा दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. या माहिती पुस्तिकेचा विषय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बहुआयामी व्यक्तिमत्त्व असा आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानमार्गी, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, अर्थप्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रज्ञ, राजकीय मुत्सद्दी, कायदामंत्री, संविधानाचे प्रमुख शिल्पकार, भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषक आणि बौद्धधम्मचक्रप्रवर्तक या विविध क्षेत्रांतील कार्याबाबत सर्वसामान्यांना उजळणी व माहिती देण्याच्या उद्देशाने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.
याप्रसंगी सभागृह नेते यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसूरकर, ‘एस व टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा समिता कांबळे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (परिमंडळ -२) नरेंद्र बरडे, उप आयुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) रमेश पवार, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले-पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, रवि गरुड, सदानंद मोहिते, भारतीय बौध्द महासभेचे रमेश जाधव व भिकाजी कांबळे, संबंधित अधिकारी व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.