बाबासाहेबांच्या स्मृती स्थळांना भेटी देण्यासाठी खास बसेस -
मुंबई । प्रतिनिधी - डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी दादर चैत्यभूमी परिसरात येतात. चैत्यभूमीयेथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर भीम अनुयायी बाबासाहेबांचे ज्या ठिकाणी वास्तव्य व बाबासाहेबांच्या स्मृती असलेल्या ठिकाणी भेट देतात. भीम अनुयायांना बाबासाहेबांच्या स्मृती स्थळांना भेटी देता याव्यात म्हणून बेस्ट उपक्रमाने खास बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. या बसेसमुळे बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळांना भेट देता येणार आहे.
भीम अनुयायांना मुंबई परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या स्मृती स्थळांना भेटी देता याव्यात म्हणून बेस्ट उपक्रमाच्यावतीने यावर्षी 5 व 6 डिसेंबर रोजी सकाळी 8, 8.30, 9, 9.30 व 10 वाजता पाच बसेस दादर शिवाजी पार्क सेनापती बापट पुतळा येथून सोडल्या जाणार आहेत. या बससेवेकरिता प्रति प्रवासी 150 रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. या बसफेऱ्यांचे तिकीट शिवाजी पार्क आणि वीर कोतवाल उद्यान, प्लाझा येथे उपलब्ध केली जाणार आहेत. याच प्रमाणे 4 डिसेंम्बर ते 7 डिसेंम्बर या कालावधीमध्ये दादर स्थानक (प) येथून शिवाजी पार्क दरम्यान बसमार्ग क्रमांक दादर फेरी - 2 या बसमार्गावर संपूर्ण दिवस अतिरिक्त बसफेऱ्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. विशेषता 5 डिसेंम्बर 2017 रोजी संपूर्ण रात्र व दि 6 डिसेंम्बर 2017 रोजी 24 तास बससेवा कार्यरत राहील. बोरिवली रेल्वे स्थानक (पु) येथून कान्हेरी गुफा दरम्यान बसमार्ग क्रमांक 188 वर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 दरम्यान बससेवा चालविण्यात येईल. मालाड स्थानक (प) आणि मारवे चौपाटी दरम्यान सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 दरम्यान बसमार्ग 272 वर बससेवा चालविण्यात येईल. बोरिवली स्थानाक (प) येथून गोराई खाडी दरम्यान सकाळी 9.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक 247/294 या बसमार्गावर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहे. बस क्रमांक 241, 351 व 354 या बस रात्रभर सुरु ठेवण्यात येणार आहेत. यासाठी दैनंदिन बसपास - शहरी प्रवासाकरिता रु 40/- उपनगरीय प्रवासाकरिता रु 50/- व संपूर्ण प्रवर्तन क्षेत्राकरिता रु 70/- उपलब्ध आहेत. दैनंदिन बसपासाकरिता असलेले आरएफआयडी स्मार्ट कार्ड ओळखपत्राची अट 4 ते 9 डिसेंबर या कालावधीकरिता शिथिल करण्यात आलेली आहे. याचा लाभ इतर मुंबईकर नागरिकांनाही होणार आहे. तसेच आनंद यात्री योजनेअंतर्गत सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना दैनंदिन बसपास अर्ध्या किमतीत उपलब्ध केले जाणार आहे.
तंबाखू सोडणाऱ्यांना भेट वस्तू -
बेस्टचा वैद्यकीय विभाग, कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन आणि मलेशिया रिदम फाउंडेशन यांच्या द्वारे तांबाखू सेवनाचे दुष्परिणाम व संभाव्य धोके याबाबत जनजागृती केली जाणार आहे. कायमस्वरूपी तंबाखू बंद करण्याची इच्छा असणाऱ्या पहिल्या 500 जणांसाठी गृहउपयुक्त भेट वस्तू देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेद्वारे एड्सविषयी तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया, स्वाईन फ्लू या आजारांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
भीम अनुयायांना अल्पोपहार -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या भीम अनुयायांना सालाबाद प्रमाणे याही वर्षी अल्पोपहार, बिस्कीट आणि चहाचे मोफत वाटप केले जाणार आहे. यासाठी बेस्टने आपली आर्थिक परिस्थिती खराब असतानाही या वर्षीही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे.
आंबेडकर भवन दिव्यांनी उजळणार -
दादर येथील आंबेडकर भवनमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस होती. या प्रेसला व आंबेडकर भवनला भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात भेटी देतात. मात्र दिड वर्षांपूर्वी आंबेडकर भवन पाडण्यात आले. या इमारतीची लाईट आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या अनुयायांना आंबेडकर भवन आणि प्रिंटिंग प्रेसला भेट देताना अंधार दिसणार असल्याने बेस्टद्वारे याठिकाणी तात्पुरती लाईटची व्यवस्था केली जाणार आहे.