मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील २० टक्के पथदिवे ३१ मार्च २०१८ पर्यंत एल.ई.डी. लाईट पद्धतीचे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना असे निर्देश दिले आहेत.
महापालिका क्षेत्रातील महापालिकेचे पथदिव्यांना विद्युत पुरवठा व संबंधित परिरक्षण करण्याचे काम हे बेस्ट, 'महावितरण' व 'रिलायन्स' या विद्युत वितरण कंपन्यांद्वारे केले जाते. 'बेस्ट' च्या अखत्यारित असणा-या एकूण पथदिव्यांपैकी १५ टक्के दिवे यापूर्वीच एल. ई. डी. पद्धतीचे करण्यात आले आहेत; 'बेस्ट'ला आता ३१ मार्च २०१८ आणखी १२ टक्के दिवे एल.ई.डी. आधारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'महावितरण' व 'रिलायन्स' या विद्युत वितरण कंपन्यांकडे असलेल्या पथदिव्यांपैकी २० टक्के पथदिवे हे ३१ मार्च २०१८ पूर्वी एल.ई.डी. पद्धतीचे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार महापालिकेच्या सर्व २४ विभागात कोणते पथदिवे बदलवायचे; याबाबत संबंधित सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या परिसराची गरज लक्षात घेऊन तातडीने प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही यादी पुढील आठवड्याभरात संबंधित खात्याकडे सादर करण्याचे आदेश बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.