मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील कुलाबा ते माहिम परिसरात सुमारे ६६ पाण्यांच्या टाक्यांची ब्रिटीशांनी निर्मिती केली होती. पाण्याची साठवण व आप्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या टाक्यांचा वापर केला जात होता. सध्या या टाक्या वापराविना पडून असल्याने त्या वापरात आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिका आयुक्तांनी तसे निर्देश अग्निशमन दलांला दिले असून या टाक्यांतील पाणी परिसरात आगणाऱ्या आगी विझविण्यासाठी केला जाणार आहे.
भूगर्भात पाण्याच्या 66 टाक्यां आढळून आल्या आहेत. या टाक्यांची पाण्याची क्षमता 2.50 लाख लिटरची आहे. पूर्वी या पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा आणि उभ्या नळ खांब्याचा वापर आग विझविण्यासाठी केला जात होता. मात्र, वाढत्या शहरीकरण व अतिक्रमणामुळे 66 पैकी 13 भूगर्भातील नामशेष झाल्या आहेत. मात्र उर्वरित 53 पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शिवसेनेचे तत्कालीन नामनिर्देशित सदस्य अवकाश जाधव यांनी, भूगर्भातील दुर्लक्षित पाण्याच्या टाक्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच या टाक्यांतील पाण्याचा वापर आपत्कालीन परिस्थिती केला जावा, अशी मागणी केली होती. 7 ऑक्टोबर 2016 मध्ये ही सूचना पालिका सभागृहाने मंजूर केली होती. दरम्यान, राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने 1960 मध्ये पालिकेला हस्तांतरीत केल्या आहेत. या टाक्यांमधील पाण्याचा वापर आप्तकालीन आग विझविण्यासाठी करावा, यासाठी अग्निशमन दलाला हस्तांतरीत केल्या जाणार आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.