मुंबई । प्रतिनिधी 13 Nov 2017 -
एल्फिस्टन रेल्वे स्थानकात 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर 13 ऑक्टोबरला एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स डोक्यावर पडून एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. एल्फिस्टन येथील घटनेची पुनरावृत्ती अंधेरी स्थानकात घडली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिनाही पूर्ण होत नाही, तोच अंधेरी स्थानकावर दुसरी दुर्घटना घडली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.एल्फिस्टन रेल्वे स्थानकात 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या 23 प्रवाशांच्या मृत्यू नंतर रेल्वे स्थानके आणि पादचारी पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. सुरक्षा ऑडिट केल्या नंतर 13 ऑक्टोबरला एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स डोक्यावर पडून अनिता बसाक (38) ही महिला प्रवासी जखमी झाली होती. चेंबूर येथे राहणा-या अनिता बसाक दुपारी कामानिमित्त एल्फिन्स्टन येथे आल्या होत्या. या वेळी तिकीट खिडकीजवळील चौकटीवरील टाइल्स त्यांच्या डोक्यावर पडली. स्थानकावरील रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बलाच्या जवानांसह स्थानकावरील रुग्णवाहिकेतून अनिता यांना केईएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बसाक यांच्या डोक्यावर दोन टाके पडले होते.
एल्फिन्स्टन येथील अनिता बसाक यांच्या डोक्यावर टाईल्स पडण्याच्या दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत असतानाच अंधेरी स्थानकातही असाच प्रकार घडला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकातआशा मोरे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असताना अचानक स्लॅब त्यांच्या डोक्यात कोसळला. स्लॅब कोसळल्याने आशा मोरे जागेवरच बेशुद्ध पडल्या होत्या. यानंतर त्यांना तात्काळ रेल्वेच्या अॅम्ब्युनलन्समधून कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत. मोरे यांच्या डोक्यावर 20 टाके पडले असताना रेल्वेने मात्र त्यांना उपचारासाठी फक्त 500 रुपयांची मदत दिली आहे. डोक्याच्या दुखापतीवर फक्त 500 रुपयांमध्ये उपचार कसे होणार, असा प्रश्न आशा मोरे यांच्या नातेवाईकाने विचारला आहे.