मुंबई | प्रतिनिधी -
संविधानाने दिलेली हमी आणि मूल्ये धोक्यात आली आहेत, अशा वेळी जनतेला सजग रहावे, असे आवाहन करीत मोदी सरकार विरोधात रविवारी संविधान जागर यात्रेत विविध सामाजिक संघटना, संस्थानी एल्गार पुकारला. यावेळी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यानी मोदी सरकारवर हल्ला बोल केला. भाजप सरकार विविध मार्गानी सविधानावर हल्ले करीत आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी भाजपा हटाव देश बचाव असे आवाहन त्यांनी केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटना, संस्थानी एकत्र येवून संविधान जागर यात्रा काढली. या यात्रेची सांगता दादर, चैत्य भूमी येथे झाली यावेळी कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. मागील तीन वर्षांपासून पावसाची वाट पाहावी तशी अच्छे दिनची वाट पाहात आहोत. तरीही हे दिवस देशातील लोकांना दिसलेले नाहीत. सामाजिक, आर्थिक समानतेवर एकही धोरण न राबवता देश अस्थिर आणि खीळ खिळा केला आहे. जातीयवाद आणि मनुवादी व्यवस्थेने देश दुभंगला आहे. जातीयवादी आणि हुकूमशाही व्यवस्था नष्ट करणे हे आपल्या समोरील आव्हान आहे, असे जशास तसे उत्तर देण्याचे त्यांनी आवाहन केले. मी लाभार्थी अशी राज्य सरकारकडून जाहिरात केली जाते आहे, याची त्यांनी खिल्ली उडवली. शेतकरी हा लाभार्थी नाही तर तो त्याचा हक्क आहे, हा हक्क हिसकावून घ्यायला हवा असेही तो म्हणाला.
मोदी सरकारच्या विरोधात कोणी बोट दाखवल्यास त्याचे बोट कापले जाईल, असे बोलले जात असल्याचे सांगत भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आपण त्यांच्या विरोधात एकत्र येऊन बोट दाखवू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मोदी सरकारचा भ्रष्टाचार हे कॉर्पोरेट भ्रष्टाचार असून त्यांनी घेतलेला नोट बंदीचा निर्णय हा अमेरिकेच्या क्रेडिट कंपनीच्या फायद्यासाठी घेतल्याची टीका त्यांनी केली. सरकार विरोधातील आर-पारच्या लढाईला एकजुटीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. समविचारी लोकांनी एकत्र येऊन जातीवादी सरकार दूर करूया असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या कामगीरीचा समाचार घेतला. कामगार, शेतकरी संकटात आहेत, बेरोजगारी वाढत आहेत. सर्वच घटकाची या सरकारने फसवणूक केल्याची टीका त्यांनी केली. संविधान जागर यात्रेचा प्रारंभ गोवंडी येथून होऊन समारोप चैत्यभूमीवर झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांची भाषणे झाली.