मुंबई | प्रतिनिधी -
भारतीय संविधानाने सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथाच्या लोकांना एकसूत्रात बांधण्याचे काम केले आहे. आज लोकशाही प्रगल्भ होत आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच. त्यामुळे या संविधानाची मुल्ये सगळ्यांनी जपावी,असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज चैत्यभूमी दादर येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयोजित 'संविधान दौड आणि गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राहुल शेवाळे, आमदार भाई गिरकर, माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल, आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू विष्णू मगरे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रमेश शिंदे, धावपटू, विविध स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस राज्यात साजरा करण्यात आला आहे. आता राज्यात आजपासून पहिल्यांदाच संविधान दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर आता दरवर्षी या संविधान दौडचे संपूर्ण राज्यासह भारतातही आयोजन करण्यात येईल. संविधानामुळेच सर्वसामान्य व्यक्ती या राज्याचे खासदार, मंत्री, राज्यमंत्री आदी महत्वाची पदे भूषवित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभाग लोकोपयोगी कार्यक्रम आखत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतीय जनतेला आपली राज्यघटना माहीत व्हावी, हा एकमात्र उद्देश ठेवून हा संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे. समताधारीत समाज निर्मिती होण्यासाठी सर्वांनी जागृत राहायला पाहिजे. यासाठी आपण सर्व संकल्प करू तसेच शासनही यासाठी कटिबद्ध आहे, असेही बडोले यावेळी म्हणाले.
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यावेळी म्हणाले की, इंदू मीलची जागा ताब्यात घेण्यात आली असून त्याठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. आता पुढील काळात इंदू मिलच्या जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार असून याबाबतच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार भाई गिरकर, संविधान तज्ज्ञ प्रशांत पगारे आदींची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी केले. संविधान दौडमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.