मुंबई, दि. 20 Nov 2017 - संगीत नाटक निर्मितीची संख्या कमी होत चालली आहे. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटके पोहोचविण्याची आवश्यकता असून आपण संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करुन संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करुन देऊ. सरकार म्हणून संगीत नाटकांना नक्कीच मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठिशी उभे राहू आणि ज्या नाट्यगृहांमध्ये संगीत नाटकांचे प्रयोग ठेवण्यात येतील ते नाट्यगृह संगीत नाटकांसाठी मोफत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार बाबा पार्सेकर यांना, ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांच्या हस्ते तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार निर्मला गोगटे यांना ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी तावडे बोलत होते.
तावडे म्हणाले की, आज ज्या रंगकर्मीना शासनाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्या ज्येष्ठ कलाकारांचे या क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. म्हणूनच असे जीवनगौरव पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते न देता याच क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते देण्याची परंपरा आम्ही सुरु केली. हे पुरस्कार म्हणजे कलाकारांच्या कलेचा खऱ्या अर्थाने सत्कार आहे.
सध्या संगीत नाटकांची संख्या कमी होत चालली आहे. या संगीत नाटकांना त्यांचे जुने वैभव प्राप्त करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने संगीत नाट्य क्षेत्रातील कलाकार, निर्माते यांची एक नुकतीच बैठक पार पडली. या चर्चेनुसार येत्या काही महिन्यांमध्ये शासन नाट्य परिषदेच्या सहकार्याने संगीत नाटक निर्मितीसाठी नक्कीच भर देईल. संगीत नाट्य लेखकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या कार्यशाळेत आयोजित ज्येष्ठ रंगकर्मींचे मार्गदर्शन करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. आजच्या युवापिढीसाठी संगीत नाटकं कमी होऊ लागली आहेत, त्यामुळे नवीन पिढीसमोर संगीत नाटकांची निर्मिती करण्याच्यादृष्टीने संगीत नाटक निर्मितीला मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्य नाट्य स्पर्धा १९ केंद्रावर सुरु आहेत. या स्पर्धेसाठी काही जुने नियम आहेत. ज्या नाट्य केंद्रावर नाट्य संस्थेचे १५ पेक्षा कमी प्रवेश आले आहेत, अशा केंद्रावर एकच नाटक अंतिम स्पर्धेसाठी निवडले जात होते. परंतु आता अधिकाधिक नाटकांना आणि त्यांच्या कलेला संधी देण्याच्या दृष्टीने ज्या नाट्य केंद्रावर नाट्य स्पर्धेसाठी १५ प्रवेशांपेक्षा अधिक नाट्य संस्थेचे प्रवेश आले असतील त्या नाट्य केंद्रावर अंतिम फेरीसाठी एकाऐवजी २ नाटके अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील असेही, तावडे यांनी घोषित केले.