पेव्हर ब्लॉकमुळे अपघाताचे प्रमाण वाढले - कॉंग्रेसचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2017

पेव्हर ब्लॉकमुळे अपघाताचे प्रमाण वाढले - कॉंग्रेसचा आरोप


मुंबई । प्रतिनिधी - रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक काढून डांबर व सिमेंट क्रॉंक्रिटीकरणाचे रस्ते बनविण्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता. मात्र, वर्षभरातच आयुक्तांचा दावा फोल ठरला असून मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर आजही पेव्हर ब्लॉक दिसून येत आहेत. या ब्लॉकमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेस (एस.सी) सेलचे सरचिटणीस दिपक जाधव यांनी केला आहे.

मुंबईत रस्ते, फुटपाथवरील पेव्हरब्लॉक हे कंत्राटदार, अधिकारी व नगरसेवक यांचे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याने याला वेसन लावण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वर्षभरापूर्वी घेतला होता. पेव्हरब्लॉक हद्दपार करण्याचे आदेशही वॉर्डनिहाय देण्यात आले. या निर्णयाचे स्पष्टीकरण यंदाच्या अर्थसंकल्पातही करण्यात आले. असे असताना मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर पुन्हा पेव्हरब्लॉक बसवल्याचे दिसून येत आहेत. अनेकवेळा डांबरी रस्ते तोडून तेथे पेव्हरब्लॉकचे रस्तेही बनवले जातात. हे ब्लॉक अनेकदा निखळतात. परिणामी अपघात होतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी पूर्व उपनगरात एका दुचाकी चालकाचा पेव्हर ब्लॉकवरुन घसरुन पडल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप दिपक जाधव यांनी केला आहे. तसेच संबंधित वाहन चालकाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक काढून तेथे सिमेंट क्रॉक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे, अशा मागण्या जाधव यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.

Post Bottom Ad