मुंबई, दि. २९ : राज्यात सुरु असलेल्या इतर अकादमीप्रमाणे पाली अकादमी सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिल्या.
पाली अकादमी स्थापन करण्याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार गौतम चाबुकस्वार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव एस.एस.तागडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पाली आणि बुद्धीझम विभागाचे प्रमुख डॉ.प्रशांत पगारे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली विभागाचे डॉ. महेश देवकर, के. जी. सोमय्या फॉर बुद्धीष्ट स्टडीज्च्या प्रभारी संचालक डॉ. सुप्रिया राय आदी मान्यवर उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले की, पाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्य आहे. पाली साहित्याची लोकांना माहिती व्हावी, लोकांना पाली भाषा शिकता यावी, पाली मधील ग्रंथांचे भाषांतर होण्याच्या दृष्टीने आणि पाली भाषेच्या विकासासाठी विविध कार्यक्रम अंतर्भूत होईल अशा प्रकारेअकादमीबाबतचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी समिती गठित करावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
आमदार चाबुकस्वार म्हणाले की, पाली भाषेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. ज्या शाळा पाली भाषा सुरु करतील अशा शाळांना पाली अकादमीच्या माध्यमातून अनुदान देण्याबाबतही विचार व्हावा. पाली भाषेच्या प्रसारामुळे जुन्या संस्कृतीची ओळख होईल. यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल. उपस्थित पाली भाषेच्या अभ्यासकांनी पाली अकादमी सुरु करण्याच्या अनुषंगाने यावेळी विविध सूचना केल्या.