मोकळया मैदानासाठी राष्ट्रवादी आणखी तीव्र आंदोलन करणार – सचिन अहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2017

मोकळया मैदानासाठी राष्ट्रवादी आणखी तीव्र आंदोलन करणार – सचिन अहिर


मुंबई | प्रतिनिधी -
मैदाने आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोरेगाव दणाणून सोडले. मुंबईतील मोकळ्या जागा हडपण्याचा शिवसेना-भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.
शिवसेना आणि भाजप पक्षांचा मुंबईतील मोकळया जागा हडपण्याचा डाव असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याविरोधात तीव्र मोहिम उघडली आहे. शिवसेना-भाजपचा हा डाव उध्वस्त करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधनकार ठाकरे उदयान गोरेगाव येथून निषेधाला सुरुवात केली. यावेळी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेना-भाजप सरकारवर आणि महानगरपालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी निषेध सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हक्काची जेवढी खाजगी संस्थांना दिलेली मोकळी मैदाने आहेत ती परत महानगरपालिकेने ताब्यात घ्यायला पाहिजेत असे आदेश दिले होते परंतु असे असतानादेखील २३६ मैदानांपैकी फक्त १०० मैदाने महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे ज्या-ज्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या ताब्यामध्ये मैदाने आहेत त्यामधील ३० ते ३५ मैदानांवर महानगरपालिका कारवाई करत नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाला त्यांच्याच मंत्र्यांनी बगल दयायची हा कुठला न्याय...बाकींच्याची मैदाने ताब्यात घेतली मग ही हिम्मत का दाखवत नाही. गोरेगावमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री म्हणजे एक तेरा एक मेरा असा खेळ सुरु आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ४० हजार कोटीचे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची मैदाने सांभाळू शकत नाही . ती महानगरपालिका मुंबईतील नागरिकांच्या समस्या काय सांभाळू शकते. हे महानगरपालिकेचे आणि शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे अपयश आहे त्याचा निषेध करण्यात आला आहे. ही आता फक्त सुरुवात आहे. गोरेगाववरुन मातोश्री आणि मग जोगेश्वरीला,आणि संपूर्ण मुंबईमध्ये हे आंदोलन करणार आहोत आणि ही मैदाने ताब्यात घेतली नाहीत यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असे सचिन अहिर यांनी सांगितले. या निषेध आंदोलनामध्ये गोरेगाव आणि परिसरातील व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad