‘महापौर निवासा’बाबत एका महिन्यात निर्णय घ्या - अनंत नर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2017

‘महापौर निवासा’बाबत एका महिन्यात निर्णय घ्या - अनंत नर


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईच्या महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबईच्या महापौरांनी राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौर बंगल्यात होणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत एका महिन्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाला दिले.

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर झाला आहे. स्मारकासाठी लागणार्‍या विविध परवानग्या आणि इतर कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. असे असताना महापौरांच्या निवासासाठी पर्यायी जागेचा शोध मात्र प्रशासनाने अद्याप घेतलेला नाही. राणीच्या बागेत शांतता भंग होणार असल्यामुळे हा पर्याय महापौरांनी नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महापौरांच्या निवासासाठी कोणती जागा निश्चित केली याबाबत शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी सुधार समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या माजी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली होऊन काही महिने उलटले असताना नेहरू पार्क येथील बंगला त्यांच्याच ताब्यात असल्याचे सांगितले. पालिका प्रशासनाने महापौर बंगल्याबाबत आपली भूमिका तातडीने जाहीर करावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली. यावर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महापौर हे प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना सन्मानजनक आणि योग्य निवासस्थानाची व्यवस्था करून देणे ही मुंबई महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad