के पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील काही भागात गेले दोन ते तीन महिने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या विभागातील नागरिकांना पाणी मिळावे म्हणून पालिकेच्या विभाग कार्यालयाला व स्थानिक भाजपच्या आमदार भारती लव्हेकर व नगरसेविका रंजना पाटील यांना निवेदन देण्यात आले. 15 दिवसात पाणी पुरावठा सुरळीत होईल असे आश्वासन आमदार आणि नगरसेविकेने दिले होते. आमदार आणि नगरसेविकेने दिलेले आश्वासन फोल गेले आहे. विभागातील पाण्याची समस्या सुटली नसल्याने येत्या काही दिवसात पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे उप शाखाप्रमुख सुबोध चिटणीस यांनी दिला आहे.
अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग, जीवन नगर, सहकार नगर, टेप दर्गा, रामवाडी, आझाद नगर इत्यादी परिसरात 16 ते 17 हजार नागरिक राहतात. या नागरिकांना गेले दोन ते तीन महिने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या विभागांना सकाळी 5.30 ते 11.30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करण्यात येऊन सकाळी 7. 45 ते 10. 30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असताना पाणी पुरवठा करण्याची वेळही कमी केल्याने नागरिकांचे आणखी हाल होऊ लागले आहेत. महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना व सोसायट्यांना पाण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. खाजगी पाण्याच्या टँकरसाठी एका एका सोसायटीला महिन्याला तब्बल 50 ते 60 हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने येथील नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभारा विरोधात संतापाची लाट पसरली आहे. पालिकेच्या के पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पिसाळ यांना घेराव घातला असता आठ दिवसात समस्या सोडवू असे आश्वासन देण्यात आले होते. याबाबत भाजपच्या स्थानिक नगरसेविका रंजना पाटील व आमदार भारती लव्हेकर यांना नागरिकांनी पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. यावर 15 दिवसात पाणी पुरावठा सुरळीत करू असे आश्वासन दिले होते, मात्र आमदार आणि नगरसेविकेला पाणीपुरवठा सुरळीत कऱण्यात अपयश आले आहे. आमदार आणि नगरसेविकसने 15 दिवसाचे आश्वासन दिले होते. हे 15 दिवस रविवारी 26 नोव्हेंबरला संपले आहेत. अद्यापही पाण्याची समस्या सुटलेली नाही. यामुळे आता पाण्यासाठी आंदोलनाशिवाय कुठलाही मार्ग राहिला नसल्याचे चिटणीस यांनी सांगितले. लवकरच पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा चिटणीस यांनी दिला आहे.