गुजरात निवडणुक 2017 -
गुजरात, पोरबंदर | अजेयकुमार जाधव -
पोलिसांनी एखाद्या मीडियाची गाडी अडवल्यास मोठा वादंग निर्माण होतो. गुजरातमध्ये मात्र नेमकी याच्या विरुद्ध प्रकार पहावयास मिळत आहे. गेल्या 22 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेची येत्या 4 व 9 डिसेंबरला निवडणूका होत आहे. त्यासाठी गुजरात पोलीस अलर्ट झाली आहे. पोलिसांकडून ठीकठिकाणी करण्यात येणाऱ्या तपासणीमधून पत्रकारांच्या गाड्याचीही तपासणी होत आहे.
गुजरात पॅटर्न म्हणून गवगवा झालेल्या राज्यातील निवडणूकीकडे संपूर्ण देशातील मीडियाचे लक्ष लागले आहे. यामुळे निवडणूकीचे वृत्तसंकलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मीडिया प्रतिनिधीं गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. गुजरात मधील निवडणूका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र म्हणून ओळखला जाणाऱ्या 46 जागांची निवडणूक होत आहे. निवडणुकीत पैसा आणि दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गुजरातमध्ये दारू बंदी असली तरी सौराष्ट्रमधील काही विधानसभा क्षेत्रात बाहुबली उमेदवार असल्याने पोलिसांना या ठिकाणी दारू, पैसा आणि शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वाटत असल्याने अनेक ठिकाणी पोलीस वाहनांची तपासणी करत आहेत. या तपासणीमधून गुजरात बाहेरून आलेल्या मीडिया प्रतिनिधींच्या गाड्याही तपासल्या जात आहेत. तपासणी करताना त्यामधील प्रवाशांची, वाहनांची, कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीची व्हिडीओ शूटिंगही केले जात आहे. इतरवेळी पोलीसांनी आपली गाडी अडवल्यास हुज्जत घालताना पत्रकार दिसतात. मात्र गुजरातबाहेरून आलेले मीडिया प्रतिनिधीही कोणतीही हुज्जत न घालता आपल्या गाड्या तपासणी करण्यास सहकार्य करत आहेत. यामुळे मीडियाचे पोलिसांकडून पत्रकारांचे आभार व्यक्त केले जात आहे.