मुंबई 16 Nov 2017 - नगर विकास व गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडला भेट दिली. देवनार डम्पिंग ग्राऊंड येथील वीजेची सुविधा, तैनात असलेले सुरक्षा रक्षक व पोलिसांना मुलभूत सुविधा देण्याबाबतची सूचना यावेळी डॉ. पाटील यांनी केल्या.
डॉ. पाटील यांनी देवनार डंपिंग ग्राऊंडच्या भेटीदरम्यान उच्चस्तरीय नियंत्रण समितीने (हाय पॉवर मॉनिटरिंग कमिटी) दिलेल्या सूचनांची योग्य रीतीने अंमलबजावणी होत आहे की नाही याची संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तसेच मागील वर्षी येथे लागलेल्या आगीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलण्यात आली, याचा आढावाही पाटील यांनी यावेळी घेतला. देवनार डंपिंग ग्राऊंडला त्यावेळी लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.