मुंबई, दि. २९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळी केलेली ठिकाणे तसेच त्यांनी वास्तव केलेली ऐतिहासिक ठिकाणे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याच्या कामाचे 15 दिवसात अंदाजपत्रक तयार करावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ केलेली ठिकाणे व त्यांनी वास्तव केलेली ठिकाणे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत बडोले बोलत होते.
बडोले पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ केलेली ठिकाणे व त्यांनी वास्तव केलेली ठिकाणे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची कामे नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या कामांचा आराखडा तयार नाही किंवा जागेचा ताबा मिळाला नाही अशा ठिकाणांच्या संबंधित अडचणी दूर करुन, सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आमदार भाई गिरकर यांनी बैठक घेऊन या कामांचा पाठपुरावा करावा, रायगड जिल्ह्यातील चरी येथे स्मारक उभारण्यासंदर्भात आवश्यक त्या परवानगी मिळविण्यासाठी कार्यवाही करावी. महाड येथील चवदार तळे, क्रांतीस्तंभ येथील विकासाची कामे नगरपालिका महाड यांनी करावे, असे सांगून ते म्हणाले संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी या कामात विशेष लक्ष द्यावे.
या बैठकीस आमदार भाई गिरकर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा, दोन्ही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आदी यावेळी उपस्थित होते.