मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईत बच्चे कंपनीसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या प्राणी संग्रहालायत (राणीची बाग) नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी येणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पर्यटकांना सूचना देण्यासाठी पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागाने उद्यानात सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई भायखळा येथील राणीबागेत पेंग्विन आल्यापासून आणि उद्यानाचे सुशोभीकरण केल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात चोरी, अफरातफर, गैरप्रकार, अपघात, अन्य प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता आहे. राणी बागेती शिस्तबद्ध निरीक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी या विस्तीर्ण क्षेत्रावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली लावण्यात येणार आहे. तसेच डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर बसवण्यात येणार आहे. यासाठी 5 कोटी 64 लाख 63 हजार 766 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मे. कॉमटेक टेलिसोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीला हे काम दिले जाणार आहे. त्यासाठी यांत्रिकी आणि विद्युत विभागाने प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाला बुधवारच्या स्थायी समितीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.