स्वच्छ भारत व घर घर शौचालय अभियानाची वाट लावली -
मुंबई । प्रतिनिधी - घरगुती शौचालय बांधल्यानंतर त्याची जोडणी महापालिकेच्या मलनिःस्सारण वाहिनीस जोडण्यास अधिकारी नकार देतात अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास अशी जोडणी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असे उत्तर देण्यात येत असल्याचे भाजपा नगरसेवक विद्यार्थी सिंग यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले. घरगुती शौचालये पालिकेच्या मलनिःसारण वाहिनीला न जोडल्याने विभागात अस्वच्छता पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सिंग यांनी सांगितले. यामुळे मुंबई महापालिकेकडून स्वच्छ भारत व घर तेथे शौचालय अभियानाची वाट लावल्याचे उघड झाले आहे.
मुंबईमधील मलनिःस्सारण वाहिन्यांची साफसपाई आणि परिरक्षण करण्यासाठी पालिकेतर्फे धोरण बनवण्यात यावे असा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत डॉ. सईदा खान यांनी मांडला होता. त्यावर स्थायी समितीत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मुंबई शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारची घर घर शौचालय योजना राबविण्यात येत आहे. झोपडपट्टी भागात शौचालये बांधण्यास केंद्र सरकारकडुन 12 हजार रुपये देण्यात येतात. परंतु घरगुती शौचालय बांधल्यानंतर या शौचालयाची मलनिःस्सारण वाहिनी पालिकेच्या मलनिःस्सारण वहिनीला जोडण्यासाठी पैसे नसल्याचे उत्तर पालिका अधिकाऱ्याने दिल्याचे नगरसेवक विद्यार्थी सिंग यांनी स्थायी समितीत प्रशासनाच्या निदर्शनास आणले. तसेच आपल्या विभागात खंडेराय डोंगरी परिसरात एका ठिकाणी १० ते १५ शौचालय तर दुसऱ्या ठिकाणी २५ तयार आहेत परंतु त्यांची जोडणी पालिकेच्या मलनिःस्सारण वाहिनीला जोडली नाहीत. त्यामुळे हे शौचालय वापराविना पडून आहेत अशी माहिती विद्यार्थी सिंग यांनी दिली. यावर मुंबईत काही ठिकाणी शौचालये अश्या ठिकाणी आहेत कि ज्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनीला जोडणे शक्य नाही. मात्र ज्या भागात शक्य आहे त्या भागात शौचालयांची जोडणी मलनिस्सारण वहिनीला जोडली जाईल असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.