मच्छी विक्रत्यांचे भाडे दुप्पट होणार
मुंबई । प्रतिनिधी 21 Nov 2017 -
महापालिकेच्या मंडईमधील गाळ्यांचा खर्च अधिक असून उत्पन्न मात्र कमी आहे. मंडईच्या माध्यमातून पालिकेला मिळणाऱ्या महसुलात वार्षिक 24 कोटी 34 लाखांची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी गाळ्यांच्या भाड्यात 10 टक्क्यांनी तर मच्छी विक्रत्यांचे आणि ठोक भाडे देणार्या गाळेधारकांच्या भाड्यात दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. ही भाडे वाढ लागू झाल्यानंतर दरवर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
शहरात मुंबई महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये शंभरहून अधिक मंडया आहेत. या मंडईमधील गाळ्यांच्या भाड्यामध्ये 1996 पासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही. गेल्या 21 वर्षांत भाडेवाढ झाली नसताना मंडयांचे परिरक्षण आणि व्यवस्थापनासाठी होणार्या खर्चात मात्र मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पालिकेच्या माध्यमातून मंडईतील गाळेधारकांना सोयीसुविधा देणे आणि मंडईचा मेंटेनन्स राखण्याठी 2016-17 वर्षात प्रशासनाला 42,14,84987 इतका खर्च झाला. मात्र बाजार विभागाचे उत्पन्न 17,80,77490 इतकेच आले. यामध्ये 24,34,07488 इतकी तूट आली. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंडयांमधील गाळ्यांचे ‘मार्केटेबल व्हेज’, ‘मार्केटेबल नॉन व्हेज’ आणि ‘नॉन मार्केटेबल’ असे वर्गीकरण करून प्रति चौरस फूट भाडेवाढे केली जाणार असल्याचे भाडेवाढीच्या प्रस्तावात म्हटले आहे. मंडईतील ‘मार्केटेबल’ मधील व्हेज गाळ्यांचे सध्याचे 6 ते 8 रुपयांपर्यंत प्रति चौरस फूट असणारे सध्याचे भाडे 14 रुपये प्रति चौरस फूट होणार आहे. तर नॉन व्हेज गाळ्यांसाठीचे 9 ते 7.50 रुपये प्रतिमहा असणारे भाडे 16 रुपये आणि ‘नॉन - मार्केटेबल’ गाळ्यांसाठीचे 7.50 रुपयांपासून 12.50 रुपये प्रति चौरस फूट असणारे भाडे 20 रुपये प्रति चौरस फूट होणार आहे.