मुंबई । प्रतिनिधी - कचरा विल्हेवाटीसाठी मुंबई महापालिकेने कडक कारवाई सुरु केल्यानंतर आता सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्रे फिरवून घाण करणार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार रस्त्यावर विष्टा केल्यानंतर जर मालकाने त्या ठिकाणी स्वच्छता केली नाही तर ‘क्लिनअप मार्शल’ द्वारे १०० रुपये दंड आकाराला जाणार आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांवर ओला व सुका कचरा विल्हेवाटीची जबाबदारी महापालिकेने टाकली आहे. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या संस्थांवर पालिका, एमआरटीपी आणि प्रदूषण मंडळाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनंतर मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी पाळीव कुत्रे रस्त्यावर फिरवणाऱ्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. कुत्रे पाळण्यासाठी पालिकेकडून रीतसर परवाना घेण बंधनकारक आहे. यानुसार कुत्र्यापासून नागरिकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी संबंधित मालकाने घेणे आवश्यक असते. मात्र मुंबईत अनेक जण नियम धाब्यावर बसवून कुत्रे पाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. पहाटे आणि रात्री उशिरा या कुत्र्यांना शौचासाठी बाहेर फिरवले जाते. त्यामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण होते. कुत्र्यांच्या विष्ठेमुळे मात्र मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो. सफाईचे काम करणार्या कामगारांना ही विष्ठा उचलावी लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यामुळे कुत्रे पाळणाऱ्या नागरिकांनी याची दखल घेऊन स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वत: घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पालिकेला आहे. रस्त्यावर फिरताना कुत्र्याने विष्टा केल्यावर मालकाने ती विष्ठा त्वरित साफ करावी लागणार आहे. कुत्र्याच्या मालकाने स्वच्छता ठेवण्याकडे दुर्लक्ष केल्यास ‘क्लिनअप मार्शल’ द्वारे १०० रुपये दंड आकाराला जाणार आहे.