मुंबई । प्रतिनिधी 23 Nov 2017 - महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध बाबींसाठी आर्थिक तरतूद केली जाते. मात्र नियोजित कामे करताना पुरेशा निधी खर्च केला जात नाही. परिणामी अर्थसंकल्पातील ५० टक्क्यांहून अधिक निधी शिल्लक राहतो. परंतु, अनेकदा कामाची बिले काढण्यासाठी निधीमध्ये भ्रष्टाचार केला जातो. त्यामुळे अर्थसंकल्पातील खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी नियंत्रण आणणे गरजेचे असून पालिका आयुक्तांनी यासाठी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन केली. राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळात पालिकेतील गटनेत्या राखी जाधव, नगरसेविका सईदा खान, नगरसेवक कप्तान मलिक तसेच माजी आमदार अशोक धात्रक आदी उपस्थित होते.
आयुक्तांच्या भेटीनंतर सचिन अहिर यांनी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची भेट घेत, पालिका शाळा खाजगी संस्थांना देण्याच्या धोरणाबाबत चर्चा केली. यावेळी पालिका शाळा खाजगी संस्थांना चालविण्यास देण्याचा पूर्वीचा अनुभव चांगला नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिली. एकदा करार पत्र झाले की या संस्था पालिकेचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना जुमानत नाही. पालिकेचे उद्याने देताना जे झाले तसे शाळांच्या बाबतीत होऊ नये म्हणून सदर धोरण पारदर्शक असले पाहिजे, यासाठी जाहिरात देऊन जनतेकडून सूचना हरकती मागवण्यात याव्यात, एसएससी बोर्डासह दिल्ली बोर्डाच्या शाळांनाही प्राधान्य देण्यात यावे, खाजगीकरण हा पर्याय नसून शाळा आणि शिक्षण यांचा दर्जा उंचविण्यासाठी तज्ज्ञाची समिती बनवून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात यावे, पालिका शाळा आणि शिक्षणाचे मूल्यांकन केले जावे, आदी प्रमुख मागण्या मांडल्या. तसेच कोणत्याही परिस्थितीत पालिका शाळा खाजगी संस्थांच्या ताब्यात जाता कामा नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना अहिर यांनी केली. यावर सूचनांचा अंतर्भाव करून नवीन धोरणात त्यांचा समावेश केला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिल्याचे अहिर यांनी पत्रकारांना सांगितले.
मुलुंडमध्ये तीन दिवसात मॅनहोलची सुमारे ५० झाकणे चोरीला गेली आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाकणे चोरीचे प्रकार घडतात मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. आयुक्तांनी डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर मॅनहोलचे झाकण व त्याची जाळी कशाप्रकारे असावी याची घोषणा केली होती. परंतु, ती अमंलात आणली जात नाही. त्यामुळे नीलिमा पुराणिक यांच्या अपघातास पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च पालिकेने त्वरीत करावा आणि अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी अहिर यांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी येत्या दोन दिवसात मॅनहोलच्या झाकणांबाबत डिझाईन तयार करून निविदा काढण्याचे मान्य केले, असे अहिर म्हणाले.