मुंबई 15 Nov 2017 - मुंबईतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये गेल्या तीन दिवसांत 2500 ते 3000 युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. काही ठिकाणी विशिष्ट रक्तगटाचे रक्त उपलब्ध नसल्यास राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून अन्य रक्तपेढ्यांशी संपर्क साधून ते उपलब्ध करुन देण्यात येईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे रक्त संकलनाचे प्रमाण दरवर्षी या काळात कमी होते. असे असूनही गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी याच काळात रक्त संकलन वाढल्याचे दिसून येत आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
राज्याची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार लोकसंख्येच्या एक टक्का रक्त संकलन असणे गरजेचे असून राज्याला 11 लाख युनिट रक्ताची आवश्यकता असते. गेल्या वर्षी रक्तदानाच्या माध्यमातून 16 लाख 17 हजार युनिट रक्त संकलन करुन महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला. रक्तपेढ्यांच्या संख्येत देखील राज्य अग्रेसर आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री यांनी सांगितले, मुंबईत दोन लाख 20 हजार एवढे युनिट रक्त प्रति वर्षी संकलित होणे अपेक्षित आहे. मात्र मुंबईमध्ये राज्यातील इतर भागातून तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आणि त्यांना लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेता मुंबईत गेल्या वर्षी 59 रक्तपेढ्यांच्या माध्यमातून तीन लाख युनिट रक्त संकलन करण्यात आले. मुंबईतील स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण 96.44 टक्के आहे.
मुंबईला दररोज 900 युनिट रक्ताची गरज भासते. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्ताचा देखील समावेश आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने रक्त संकलन कमी होते. यावर मात करण्यासाठी सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक संस्था, खासगी कंपन्या यांच्या मदतीने रेल्वे स्थानके तसेच अन्य ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2016 मध्ये मुंबईतील रक्तसाठा 21 हजार 872 युनिट होता तर यावर्षी याच काळात रक्तसाठा 22 हजार 850 युनिट एवढा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी तुटवड्याच्या काळात मुंबईमध्ये जास्त रक्त संकलन झाले आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील 59 रक्तपेढ्यांचा आढावा घेतला असता सरासरी 2500 ते 3000 हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध आहे.
काही वेळेस निगेटिव्ह रक्तगट रक्तपेढीमध्ये उपलब्ध नसतात. तर काही वेळेला नियोजित शस्त्रक्रिया थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी रक्त आरक्षित केले जाते. अशा परिस्थितीत काही रक्तपेढ्यांमधून रक्त उपलब्ध असूनही ते आरक्षित असल्याने अन्य रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता नसल्याबाबत सांगण्यात येते. यावर उपाययोजना म्हणून संबंधित रक्तपेढीने नियोजन करुन तुटवड्याच्या काळात रक्त संकलनाबाबत आराखडा करावा. त्याचबरोबर रक्तदात्यांनी ठराविक प्रसंगी रक्तदान करण्याऐवजी नियमित कालावधीनंतर रक्तपेढीत जाऊन स्वेच्छेने रक्तदान करावे. या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था-संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.