मुंबई । प्रतिनिधी 17 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेचे अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट भाड्यामध्ये ५० टक्के सुट देणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घोषित केले होते. जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौरांनी सदर घोषणा केली होती. महापौरांनी केलेली घोषणा लवकरच सत्यात उतरणार आहे. जेष्ठ नागरिकांना बसभाड्यात सुट देण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या बस मधून प्रवास करताना जेष्ठ नागरिकांना बसभाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५० टक्के सवलत दिली जावी अशी मागणी जेष्ठ नागरिक संघटनांकडून केली जात होती. जेष्ठ नागरिकांची बसभाड्यात सवलत देण्याच्या बदल्यात होणार खर्च बेस्ट उपक्रमाला देण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी महापालिकने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या प्रवासी भाड्यात सुट दिल्यावर जी तफावत राहते ती तफावत पालिका भरून काढणार आहे. त्यासाठी बेस्टला दर महिन्याला केलेल्या खर्चाची बिले पालिकेला सादर करावी लागणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहात सादर करण्यात आला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ माटुंग्याच्या यशवंत नाटय मंदिरात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ज्येष्ठ नागरिकांना ‘बेस्ट’च्या बस भाडयामध्ये यापुढे 50 टक्के सुट देणार असल्याचे जाहीर केले आहे. महापौरांनी जेष्ठ नागरीकांना बसभाड्यात सुट देणार असे जाहीर केल्यानंतर तातडीने प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात आला आहे. यामुळे येत्या सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.