मुंबई | प्रतिनिधी 6 Nov 2017 -
मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वे आणि बेस्टची ओळख आहे. बेस्टच्या ताफ्यात 3777 बसेस असून या बसेस डिझेल आणि सीएनजी गॅसवर चालतात. डिझेल बसेसमुळे पर्यावरणाची हानी होत असते. याकारणाने पर्यावणापूरक अश्या 6 इलेक्ट्रिक बस घेण्याला उपक्रमाने मंजुरी दिली होती. त्यापैकी 2 इलेक्ट्रिक बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टवर चार हजार कोटी रुपायांचे कर्ज आहे. बेस्टला सध्याच्या बसमधून उत्पन्न कमी मिळत असून खर्च अधिक होत आहे. यामुळे उपक्रमाच्या परिवहन विभागाचे आर्थिक गणित बिघडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बेस्टने इलेक्ट्रिक बस घ्याव्या अशी सूचना शिवसेना युवा प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्टने 6 इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या बसेस खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 10 कोटी रुपयांचे सहाय्य बेस्टला केले होते. एका इलेक्ट्रिक बसची किंम्मत 1.61 करोड़ रुपये आहे. या बस मध्ये गियर बॉक्स नाही. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर हि बस 300 किलोमीटरचे अंतर चालू शकते. या बस चार्ज करण्याची सुविधा सध्या बॅकबे डेपोत असल्याने या डेपोमधूनच बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस मुंबईमध्येच चालवण्यात येणार आहेत. सध्या या बसची आरटीओकडे नोंदणी प्रक्रिया सुरु असून नोंदणी नंतर प्रवाशांच्या सेवेसाठी या बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील.