मुंबई । प्रतिनिधी 17 Nov 2017 -
मुंबई महापालिका हद्दीतील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण, खून होऊ नये, त्यांच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार होऊ नयेत, गुन्हेगारी घटनांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी नियमावली बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र नियमावली बनविण्यात यावी तसेच शाळांमध्ये तक्रार समिती, शिक्षक - पालक, शिक्षण विभाग व स्थानिक पोलीस अधिकारी यांची एक "सुरक्षा समिती" स्थापन करण्यात यावी, अशी मागणी पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.
हल्ली मुंबईसह देशभरात शालेय विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. दररोज कुठे ना कुठे तरी शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाची, त्याचा खून केल्याची अथवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडतात. या घटना कधी शाळेतच कर्मचाऱ्यांकडून तर कधी शालेय बस मध्ये बस चालक, बस वाहक अथवा अन्य समाज कंटकांकडून घडत असतात. यात निष्पाप लहान विद्यार्थ्यांचा नाहक बळी जातो. हे विद्यार्थी शिक्षण घेण्याच्या वयात असताना त्यांच्या बाबतीत या घटना शाळेत, बस मध्ये,सहलीच्या ठिकाणी,क्लास मध्ये, खेळाच्या मैदानाच्या ठिकाणी वरील घटनांचे शिकार ठरतात. त्यामुळे या शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी जशी घरी असताना पालकांची असते तशी शाळेत असताना त्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेचे संचालक, शिक्षकेतर कर्मचारी आदींचीही जबाबदारी असते. म्हणून शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे, स्वतंत्र नियमावली बनविणे आवश्यक असून त्यावर अमलबजावणी केल्यास हे विद्यार्थी सुरक्षित वातावरणात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतील व पुढे कोणीतरी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, खेळाडू, शिक्षक, पोलीस, सैनिक होऊन देशाची सेवा करू शकतील असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी नियमावली -
# विद्यार्थी शाळेत असताना कोणी व्यक्ती त्याला भेटायला आल्यास त्या व्यक्तीची शालेय कर्मचाऱयांनी रीतसर नोंद करणे, भेटीचा उद्देश विचारणे .
# अपरिचित व्यक्ती विद्यार्थ्यास भेटण्यास आल्यास शाळेच्या सुरक्षा रक्षकाने तेथे उपस्थित राहणे.
# विद्यार्थ्याच्या शौचालयाच्या ठिकाणी अन्य कोणीही प्रवेश करू नये,यासाठी तेथे महिला कर्मचारी नियुक्त करणे.
#शाळेच्या प्रवेशदवाराच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसविण्यात यावेत,त्यामध्ये बाहेरील संशयित व्यक्तीचे संभाषण रेकॉर्ड करण्याची व्यवस्था असावी.
# शाळेत नियुक्ती करताना शिक्षक,कर्मचारी,बस चालक,वाहक यांची पार्शवभूमी जाणून घ्यावी,त्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप,केस आहेत का, त्यांना दारू,मादक पदार्थ यांचे व्यसन आहे का ,याबाबतची खात्री करण्यात यावी.
# शालेय बस मध्येही सी सी टी व्ही कॅमेरा बसविण्यात यावेत.शक्यतो बस मध्ये महिला कर्मचाऱयांना प्राधान्य द्यावे.
#विद्यार्थी,विद्यार्थिनी शाळेतून बाहेर पडून घरी जाण्यास निघाले असता तत्पूर्वी त्यांच्या पालकांना त्यांच्या निघण्याबाबतची पूर्व सूचना मोबाईलद्वारे शाळेतर्फे देण्यात यावी.
# प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी एक पूर्ण वेळ प्रशिक्षित व्यक्ती नेमणे बंधनकारक करावे .
# शाळेत कोणतीही घटना घडल्यास त्या घटनेबाबत पूर्ण सत्य माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात यावी
# शाळेमध्ये शाळांतर्गत तक्रार समिती,शिक्षक -पालक समिती,शिक्षण समिती,शिक्षण विभाग आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांची,"सुरक्षा तपासणी समिती" स्थापन करण्यात यावी.