मुंबई । प्रतिनिधी 5 Nov 2017 -
मुंबईमधील लाईफ लाईन असलेल्या रेल्वेचे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची व मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे रूळ ओलांडू नयेत म्हणून प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे रूळ ओलांडत असतात. हे प्रकार थांबवून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन पद्धतीची तारांची कुंपणे उभारण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या सिमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तारांच्या कुंपणांप्रमाणे हि कुंपणे आहेत. मुंबईतील रेल्वे लोकलने दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दरवर्षी तीन हजार प्रवासी प्राणास मुकतात आणि तितकेच प्रवासी जखमी होतात. त्यात सर्वाधिक प्रमाण हे रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे आहे. हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तसेच पश्चिम, मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. अपघात रोखण्यासाठी महामंडळाने एमयूटीपी-३ अंतर्गत ५५१ कोटी रुपये खर्चून वेगवेगळे उपाय केले आहेत. त्यात पादचारी पूल, संरक्षक भिंती, कुंपणे बांधली जातात. मात्र तरीही संरक्षक भिंती फोडून त्यातून पायवाटा काढून रूळ ओलांडले जातात. या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण अपघाती मृत्यूंची संख्या २८०० इतकी नोंदविण्यात आली आहे. त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तारांची कुंपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेवरील घुखोरी रोखण्यासाठी तारेचे कुपन घातले जाते. असेच कुंपण रेल्वे रुळांच्या बाजूला घातल्यास रूळ ओलांडणाऱ्यांच्या संख्येत फरक पडेल असा दावा रेल्वे प्रशासनकडून करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने ठाणे ते ऐरोली, चिंचपोकळी ते करी रोड आणि परळ ते दादर या दरम्यान एकूण सहा ठिकाणी कुंपणे बांधण्याचे काम हाती घेतले असून हि कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी व्यक्त केली आहे.