मुंबई | प्रतिनिधी 5 Nov 2017 - महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त पद हे ५ महिन्यापासून रिक्त आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. या पदाबाबतची निवड प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, असेही माहिती अधिकारात पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.
गलगली यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्य माहिती आयुक्त पदासाठी इच्छुकांची यादी मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव श्वे. प्र. खडे यांनी अनिल गलगली यांना सांगितले की, रत्नाकर गायकवाड, राज्य मुख्य माहिती आयुक्त हे दिनांक २९ मे २०१७ रोजी सदर पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त पदभार अजित कुमार जैन, माहिती आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे देण्यात आलेला आहे. अनिल गलगली यांनी या पदासाठी इच्छुकांची यादी आणि सदर नियुक्ती ज्या स्तरावर प्रलंबित आहे याबाबत माहिती मागितली असता त्यांस कळविण्यात आले की राज्य मुख्य माहिती आयुक्त पदावर नियुक्तीसाठीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपणांस असलेली अपेक्षित माहिती तूर्तास देणे शक्य होत नाही. सदर नस्ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर माहिती देणे शक्य होईल.