मुंबईच्या एल्फिस्टन रोड स्थानकावर 29 ऑगस्ट रोजी अफवा पसरून झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या 23 प्रवाशांच्या मृत्यू नंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वेमंत्र्यांनी मुंबईमधील प्रवाशांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. पूल दुरुस्त करणे, नवे पूल बांधणे, नव्या गाड्या सुरु करणे अश्या अनेक निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने रेल्वेवरील पूल भारतीय सैन्याकडून बांधून घेण्याच्या निर्णयाबाबत मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
एल्फिस्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर मुंबईमधील सर्वच स्थानकामधील पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले. या ऑडिट नंतर अनेक ठिकाणी पूल जुने व अरुंद असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी एल्फिस्टन रोड स्थानकातील दुर्घटनेसारख्या घटना पुन्हा घडू शकतात असे अहवालात म्हटल्याचे समजते. 23 प्रवाशांचा जीव गेल्याने मुंबईमधील प्रवासी आधीं संतापलेला आहे. मुंबईकर प्रवाशांचा संताप कमी करण्यासाठी नव्या पुलांची आणि नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली.
नुकतीच मुंबईतील एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाला महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रवाशांना रेल्वे स्थानकातील पूल लवकर बांधून भेटतील या दृष्टीने एल्फिस्टन स्थानकात नवा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल लवकरात लवकर बांधता यावा म्हणून पुलाचे बांधकाम लष्कराकडून केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
एल्फिस्टन रॉड स्थानकातील पादचारी पूलाच्या बांधकामाला भारतीय सैन्य 5 नोव्हेंबरपासून सुरुवात करणार आहे. 31 जानेवारी 2018 पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधून पूर्ण करतील. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलाप्रमाणेच करीरोड आणि आंबिवली स्थानकातील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे.
आपत्कालीन स्थितीत कमीत कमी कालावधीत पूल बांधण्याचे कौशल्य लष्कराकडे आहे. भारतीय सैन्यातील इंजिनीयरिंग विंग यासाठी ओळखली जाते. 2010 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोसळलेला पूल लष्कराने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केला होता. यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मुंबईत पूल उभारला जाणार आहे.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिलं होतं. एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे यासारख्या स्टेशनवर, फूट ओव्हर ब्रिज वापरणा-या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकदाच पण कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. एल्फिन्स्टनचा पूल कमीतकमी वेळात बांधला जावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे शेलार यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यानीही पत्रकारांशी बोलताना टेंडर प्रकिया करणे त्यानंतर पूल उभारण्यात वेळ जाणार असल्याने हा वेळ वाया जाऊ नये म्हणून भारतीय लष्कराकडून हा पूल बांधला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. सरकार चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनाच आपल्या प्रशासनावर विश्वास नसल्याचा मुद्दा याठिकाणी उपस्थित झाला आहे. या अविश्वासाच्या मुद्द्यामुळेच नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये सरकारविरोधात चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचारी असल्याचे सांगत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाले आहे. ना खाऊंगा आणि ना खाणे दूंगा हि घोषणा खुद्द प्रधानमंत्र्यांची आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यावर भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा केला गेला आहे. मात्र भाजपा सरकारने आपल्याच प्रशासनावर अविश्वास दाखवला आहे. जे काम रेल्वे आणि महापालिकेकडून करून घ्यायला हवे ते काम लष्कराकडून करून घेतले जात आहे.
केंद्रात भाजपाचे सरकार असून रेल्वे मंत्रीही भाजपाचेच आहेत. असे असताना रेल्वेला टेंडर
काढण्यात वेळ जाणार असल्याचे कारण योग्य वाटत नाही. टेंडर काढल्याने अनेक कंपन्या सहभागी झाल्या असत्या. पारदर्शक प्रक्रिया राबवून दर्जेदार पूल बांधता आला असता. मात्र भाजपा सरकारकडून सर्वानुमते निर्णय न घेता वरून निर्णय लादण्याच्या प्रकारामुळे लष्कराकडून पूल बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपा सरकारच्या या निर्णयामुळे भाजपा सरकारचे हसे होत आहे. भारतीय लष्कर देशाच्या सुरक्षेसाठी आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्येच लष्कराला पाचारण केले जाते. मुंबईत अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नव्हती. तरीही मुंबईमधील तीन रेल्वे स्थानकातील पूल बांधण्याचे काम लष्कराकडून करून घेतले जात आहे. यावरून प्रशासनात आजही भ्रष्टाचार असल्याचे सरकारला माहीत असल्यानेच लष्कराकडून पूल बांधून घेतले जात असल्याचे चर्चा सर्वत्र रंगली आहे.
अजेयकुमार जाधव