मुंबई 4 Nov 2017 - केंद्रात ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "विकास" वेडा झालाय त्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांची "पारदर्शकता" वेडी झाली आहे, असा घणाघात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. फडणवीस सरकारच्या 3 वर्षे पूर्तीच्या पार्श्वभूमीवर आज जय महाराष्ट्र वरील संवाद या विशेष कार्यक्रमात मुंडे यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचे अक्षरशः वाभाडे काढले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे, पण कन्व्हेन्स करता येत नसेल तर कन्फ्युज करा या सूत्रानुसार मुख्यमंत्री भाजप सरकारच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचा अदृश्य हात असल्याचा चुकीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोपही मुंडे यांनी केला. हिम्मत असेल तर अदृश्य हात कुणाचे हे मुख्यमंत्री यांनी जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले.
भाजप युवा मोर्चात आणि पक्षसंघटनेत आपण स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम केल्याचा अनुभव सांगताना, तेंव्हाचे फडणवीस प्रामाणिक होते आता मात्र फसवणीस झालेत असा उपरोधिक टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.
राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजितदादा पवार असून तेच 2019 साली आमचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असा पुनरोच्चरही त्यांनी यावेळी केला.आगामी निवडणुकीला सामोरे जाताना विरोधक एकसंघ असावा आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखे वरिष्ठ नेते जाहीरपणे राष्ट्रवादीवर टीका करत असतील तर आघाडी होण्याला अडचणी होतील असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान सत्तेत राहून दिखाव्यासाठी विरोधकांची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या वाघाची मांजर झाली असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. सरकारचे अपयश आणि जनतेचे मूलभूत प्रश्न हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरे जाणार असून 2019 ला आम्ही सत्तापरिवर्तन करून दाखवू असा आत्मविश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.