मुंबई | प्रतिनिधी 9 Nov 2017
देशात खेडे गावात लोकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागते. मात्र असाच प्रकार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही घडत असून रात्री अपरात्री येणारे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबईमधील घाटकोपर आणि विक्रोळी दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात पाणी माफिया निर्माण झाले आहेत. या विभागातील नागरिकांना रात्रीच्या अकरा वाजल्या नंतर पाणी येते. तर कधीकधी पहाटे तीन वाजताही पाणी येते. जे काही पाणी येते ते किती वेळ येईल याची शाश्वती नसते. कधी कधी तर दहा ते पंधरा मिनिटे पाणी येते. तर कधी कधी खाजगीरित्या पाणी विकत घ्यावे लागते. अश्या परिस्थितीत सकाळी अंधारात पाणी भरण्यासाठी अंधारात बाहेर पडलेल्या 32 वर्षीय सुनील देठेचा पाय घसरुन मृत्यू झाला आहे. या विभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून गल्ली बोळातील पथदिवे बंद असल्यामुळे रहिवाश्याना पाणी भरण्यासाठी अंधारातच घराबाहेर पडावे लागते. अश्या परिस्थितीत पाय घसरून पडून सुनील देठे याचा मृत्यू झाल्याने याला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाश्यांकडून केली जात आहे. दरम्यान, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, रात्री पाणी सोडण्याऱ्या पालिकेच्या जल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.