मुंबई, घाटकोपर ( निलेश मोरे ) 23 Nov 2017 -
तंबाखू, सिगारेट, गुटखा यासारख्या व्यसनांतून जीवनावर होणारे विपरीत परिणाम माहीत असून देखील आजही असंख्य लोक हे व्यसन करत आहेत. महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन या व्यसनाविरुद्ध जनजागृती मोहीम घेऊन लोकांना व्यसन न करण्याचे आवाहन करत आहे. शासनाच्या या मोहिमेशी संलग्न होऊन सलाम बॉंबे फौंडेशनच्या वतीने मुंबईतील विविध शाळांतील 45 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र आणत तंबाखू मुक्त शाळा या विषयावर चित्रकला स्पर्धा घेऊन सामाजिक संदेश दिला.
बालदिनाचे औचीत्त्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या संस्थेच्या कार्यक्रमाला घाटकोपर येथील हिंदी हायस्कुल शाळेत उपस्थित राहून आपले विचार प्रभावी रीतीने मांडण्यासाठी प्रत्येक मुलाने तंबाखूमुक्त जगाविषयी बोलणारी, व्यसनमुक्तीचा संदेश सृजनशील व अत्यंत अभिनव मार्गाने देणारी पोस्टर आणि चित्रे रेखाटली. या कार्यक्रमाला उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख, बॉलिवूड गायक निकिता गांधी आणि सलाम बॉंबे फाउंडेशन मधील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुलांनी शाळेचा परिसर स्वच्छ व तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण हा आमचा अधिकार असल्याची शपथ घेतली. यावेळी उत्कृष्ट विषयानुरूप चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .