पालिका पुन्हा नांगी टाकणार का याकडे नागरिकांचे लक्ष -
मुंबई । प्रतिनिधी 9 Nov 2017 -
मुंबईत दरवर्षी मॅरेथॅान स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या आयोजकांना मुंबई महापालिकेकडून दरवर्षी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी करोडो रुपयांचे शुल्क भरण्याची नोटीस दिली जाते. नंतर मात्र महापालिका या आयोजकांच्या समोर नांगी टाकत असते. असाच प्रकार पुन्हा या वर्षीही सुरु झाला आहे. महापालिकेने स्पर्धा आयोजकांना परवानगी व इतर शुल्क भरण्याची नोटीस बजावली आहे. शुल्क न भरल्यास परवानगी देणार नाही असे महापालिकेने म्हटले असले तरी हि रक्कम न भरण्याचा पावित्रा आयोजकांनी घेतला आहे. यामुळे महापालिका दरवर्षीप्रमाणे आयोजकांपुढे नांगी टाकणार का याकडे मुंबईकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी जागेचा वापर, लेझर शो, होतात. त्यासाठी जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव अशी रक्कम पालिकेकडून आकारली जाते. मागील वर्षी सुमारे 5 कोटी 48 लाख 30 हजार 643 रुपये भरणे बंधनकारक होते. तसे पत्रही पालिकेच्या संबंधित विभागाने आयोजकांना दिले होते. मात्र आयोजकांनी 23 लाख रुपये भरून त्यावेळी परवानगी घेतली होती. यंदा मुंबई मॅरेथॉन -2018 चे 21 जानेवारीला आयोजित केली आहे. या स्पर्धेत 42 किमीचे पूर्ण मॅरेथॉन (सीएसटी-वांद्रे-सीएसटी) आणि इतर कमी अंतर चालवण्याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी प्रोकॅम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने टाटा मॅरेथॉनसाठी परवानगी घेण्यासाठी एक पत्र पाठविले आहे. या पत्राचे उत्तर देताना महापालिकेने 8 नोव्हेंबर रोजी एक पत्र पाठवले आहे. त्यात स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनसाठी 21,400 रुपयांच्या जाहिरात आणि ग्राउंड चार्जेससाठी 2.74 कोटी रुपये इतके शुल्क द्यावे अशी सूचना केली आहे. हि रक्कम पुढील सात दिवसात भरावी त्यानंतरच परवानगी देण्याबाबतची कारवाई सुरु केली जाईल असे कळविण्यात आले आहे. मात्र आयोजकांनी आतापर्यंत थकबाकी भरलेली नाही. आयोजक परवानगी शुल्क न भरताच कोर्टात गेले आहेत. आयोजक कोर्टात गेले असल्याने कोर्टाच्या निर्णयानुसार आता पुढील कारवाई होण्याची शक्यता असल्याने यंदाही मुंबई मॅरेथॅानवर परवानगीची टांगती तलवार आहे.