मुंबई । प्रतिनिधी 10 Nov 2017 -
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील झोपडी धारकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता प्रशासनाने त्यांच्या झोपड्या तोडल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चेंबूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सरकार तसेच प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.जोपर्यंत पात्र, अपात्र झोपड्या निच्छीत होत नाही तोपर्यंत रहिवाशांना त्याच ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी झोपडीधारकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता त्यांच्या झोपड्या तोडणे हे कायद्याविरोधात आहे. प्रशासनाची कारवाई ही अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार नवाब मलिक यांनी दिली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गरिबांना घरे देण्याची स्वप्न दाखवत आहेत तर दुसरीकडे गरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत. महाराष्ट्र नगरमधील नागरिकांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मलिक यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिण मध्ये मुंबई जिल्हाध्यक्ष विष्णू गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कांबळे, युवक मुंबई अध्यक्ष निलेश भोसले आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.