मुंबई | प्रतिनिधी 3 Nov 2017 -
मुंबईमधील बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील महिन्याभरात डेंग्यूचे 212 रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत विविध आजारांनी 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये डेंग्यूच्या 3 रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार बळावतात. या काळात विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन अनेकजण यामुळे दगावतात. मात्र आता पाऊस नसतानाही मुंबईत साथीच्या आजारांनी थैमान घातले असून विविध आजारांनी मुंबईकर आजारी आहेत. 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत डेंग्यूचे 212, लेप्टो 18, मलेरिया 563, गॅस्ट्रो 546, हेपेटायटीस 89 तर स्वाईन फ्ल्यूचे 5 रुग्ण आढळले. डेंग्यूसदृश्य 3293 रुग्ण आढळले. डेंग्यूमुळे 35 वर्षीय गर्भवती महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला. यात 50 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुणाचा समावेशआहे. हेपेटायटीसने 6 वर्षीय मुलाचा तर मलेरियाने 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फ़े सांगण्यात आले.