मुंबई । प्रतिनिधी 3 Nov 2017 -
जागतिक स्तरावरील बृहन्मुंबई शहराचे स्थान लक्षात घेता, या शहरात कोणतीही दुर्घटना घडली तर महापालिका सक्षम पद्धतीने सामोरे जाण्यास सतर्क असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
बृहन्मुंबई महापालिकेत मुंबई अग्निशमन दलाच्या वापराकरीता ११ नवीन वॉटर टँकर्स घेण्यात आलेले असून सदर वाहनांचा फ्लॅगऑफचा कार्यक्रम महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालय येथे सकाळी करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) राम धस, उप आयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) रमेश पवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहागंदळे, महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका काळाप्रमाणे बदलत आहे. मुंबई शहरातील बदलती स्थित्यंतरे लक्षात घेऊन महापालिकेतही आधुनिक यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मुंबईत नियमित काही घटना घडत असतात. अशावेळी मुंबई अग्निशमन दल काही मिनिटांत तेथे पोहचत असते. अग्निशमन दलाचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून प्राणहानी व वित्तहानी वाचविण्यासाठी झटत आहेत. मुंबई अग्निशमन दल आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असल्याचेही महापौर यावेळी म्हणाले. मुंबई अग्निशमन दलात दाखल झालेल्या ११ नवीन वॉटर टँकरची प्रत्येकी क्षमता १४ हजार लिटर इतकी आहे.