डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग -
मुंबई । प्रतिनिधी 5 Nov 2017 -
मुंबईत २९ ऑगस्टरोजी पडलेल्या मुसळधार पावसात सर्वत्र पाणी साचले होते. या पाण्यामधून उघडे असलेले मॅनहोल न दिसल्याने त्यात पडून सुप्रसिद्ध डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. अमरापूरकर यांच्या मृत्यू नंतर मॅनहोलबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले होते. यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली असून अश्या दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोलना नव्या आकाराची जाळी लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून बनवला जात आहे.
मुंबईतील २९ ऑगस्टच्या मुसळधार पावसात पोटविकारतज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये बळी घेतला. त्यानंतर पालिकेच्या निष्काळजीपणा समोर आला. सर्व क्षेत्रातून प्रशासनावर टीकेची झोड उठली. यानंतर मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी पासलिकेने मुंबईतील सर्व मॅनहोलना वेगळ्या आकाराची जाळी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मॅनहोलच्या झाकणाच्या 3.5 इंच खाली जाळी बसवली जाणार आहे. मोठा पाऊस झाला आणि पाणी साचल्यावर मॅनहोल उघडा राहिला तरी या जाळीमुळे कोणत्याही नागरिकाचा त्यात पडून जीव जाणार नाही. याबाबतचा अंतिम प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईत पाणी साचणाऱ्या दादर, हिंदमाता, परेल, मिलन सबवे, किंगसर्कल, चेंबूर आदी ठिकाणी सर्वप्रथम या जाळ्या लावल्या जाणार आहेत. एका मॅनहोलच्या जाळीसाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे. मुंबईत एक लाख मॅनहोल असून त्यामध्ये टप्प्या टप्प्याने जाळी बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.