पुढील वर्षांपासून ५ कोटींची तरतूद -
मुंबई । अजेयकुमार जाधव -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातील लाखो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या लाखो अनुयायांना सोयी सुविधा पुरविल्या जातात. यासाठी मुंबईच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा तसेच पुढील वर्षापासून महापरिनिर्वाण दिनासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱया विविध नागरी सेवा - सुविधांबाबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व आंबेडकरी संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील लाखो भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येतात. या ठिकाणी दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता शिवाजी पार्क व्यतिरिक्त लगत असलेल्या मैदांनामध्येही अनुयायांसाठी निवा-याची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील कार्य व लौकिक पाहता त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये वेगवेगळया विषयावरील लेख प्रसिध्द करावे, त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य सर्वत्र पोहचेल अशी सूचना महापौरांनी केली. बैठकीला उपस्थित आंबेडकरी संघटनांनी केलेल्या सुचनांचे महापौरांनी स्वागत करुन महापालिका प्रशासनाने त्या सूचना अंमलात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांना महापालिकेकडून सोयी सुविधा देण्यात येतात. या सोयी सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आंबेडकरी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी माजी नगरसेवक मनोज संसारे यांनी केली. या मागणीला सर्व आंबेडकरी संघटनांनी पाठिंबा दिला. आंबेडकरी संघटनांच्या मागणीची दखल घेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नगरसेवक व सामाजिक संघटनांची नव्याने महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती गठीत करण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले.
महापरिनिर्वाण दिनासाठी ५ कोटींची तरतूद -
जी/उत्तर विभागातर्फे वितरीत करण्यात येणाऱया स्टॉलमध्ये कंत्राटदारांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून ते शुल्क आकारु नये अशी सूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केली. तसेच हे स्टॉल ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावे, अशी सूचनाही केली. वरळीच्या जांभोरी मैदानात किंवा आंबेडकर मैदानात अतिरिक्त निवासाची व्यवस्था तसेच दादर स्थानकापासून वरळी स्मशानभूमीतील माता रमाई स्मृतीस्थळ व राजगृहापर्यंत बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करावी, बसस्टॉपवरील फलकातून आकारण्यात येणाऱया टॅक्समधून सूट द्यावी. तसेच महापरिनिर्वाण दिनासाठी स्वतंत्र बजेट हेड ओपन करुन पुढच्या वर्षापासून ५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना जाधव यांनी केली. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुढील वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असे जाहीर केले.