मुंबई । प्रतिनिधी 8 Nov 2017 -
महाराष्ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्य असे खुले व्यासपीठ अशा कलाकारांसाठी दर रविवारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर खुले व्यासपीठ हे मे २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान कलाकारांसाठी उपलब्ध असणार आहे.
सांस्कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्हणून सदर व्यासपीठ हे प्रथमच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापली कला या व्यासपीठावर रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान सादर करता येणार आहे.
यासंबंधी एक संयुक्त बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित केली होती. या बैठकीस महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यटन) नितीन गद्रे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे, उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस, नीता पाठारे, मीना नाईक, प्रफुल्ल सातोकर, संदीप जोशी, उमेश राऊत, योगेश जाधव हे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील सांस्कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, लोकनृत्ये या क्षेत्रांतील दिग्गज कलावंतांनी दर रविवारी सायंकाळी ५.०० वाजता भेट देऊन सादरीकरण करणाऱया कलावंताना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही विविध क्षेत्रांतील दिग्गज कलावंताना करण्यात येत आहे. शुभारंभदिनी सर्व कलावंताना आपापल्या कला सादर करावयाच्या असतील त्यांनी खालील क्रमांकावर दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत नांवे नोंदवावीत, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यटन) नितीन गद्रे व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी संयुक्तिकपणे केले आहे.
या कार्यक्रमात भाग घेणाऱया कलाकारांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे (भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८२२००३) व बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ए’विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (भ्रमणध्वनी क्रमांक ९९२०१८५२०१) यांचेशी संपर्क साधावा, असेही संयुक्तिकपणे कळविण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापल्या कला स्वयंस्फुर्तीने सादर करण्यासाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल.
तरी कलाकारांनी जास्तीत-जास्त संख्येने आपापली नांवे नोंदवावीत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे केले आहे. तसेच मुंबईकर नागरिक आणि पर्यटकांनीही कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचा मनमुराद आनंद लुटावा नि कलाकारांना प्रोत्साहित करावे. यासंबंधी अधिक माहिती http://m.facebook.com/mcskalaghoda या फेसबुक पेजवर संपर्क साधावा व जास्तीत-जास्त कलाकारांनी आपली नांवे नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे केले आहे.