गेले दोन महिने अंधेरीमधील नागरिकांचे पाण्यावाचून हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2017

गेले दोन महिने अंधेरीमधील नागरिकांचे पाण्यावाचून हाल


पुढील आठवड्यात पालिका कार्यालयावर मोर्चा -
मुंबई । प्रतिनिधी 3 Nov 2017 -
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील काही भागात गेले दोन महिने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या विभागातील नागरिकांना पाणी मिळावे म्हणून पालिकेच्या विभाग कार्यालयाला व स्थानिक भाजपच्या नागरसेविकेला निवेदने दिली आहेत. तरीही पाण्याची समस्या सुटली नसल्याने येत्या आठवड्यात पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे उप शाखाप्रमुख सुबोध चिटणीस यांनी दिला आहे.

अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग, जीवन नगर, सहकार नगर, टेप दर्गा, रामवाडी, आझाद नगर इत्यादी परिसरात गेले दोन महिने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या विभागांना सकाळी 5.30 ते 11.30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करण्यात येऊन सकाळी 7.45 ते 10.30 या वेळेत पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असताना आता पाणी पुरवठा करण्याची वेळही कमी केल्याने नागरिकांचे आणखी हाल होऊ लागले आहेत. महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना व सोसायट्यांना पाण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. खाजगी पाण्याच्या टँकरसाठी एका एका सोसायटीला महिन्याला तब्बल 50 ते 60 हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने येथील नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभारा विरोधात संतापाची लाट पसरली असल्याची माहिती चिटणीस यांनी दिली आहे.

या विभागातील 16 ते 17 हजार नागरिकांना गेले दोन महिने पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. यासाठी पालिकेच्या के पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पिसाळ यांना घेराव घातला असता आठ दिवसात समस्या सोडवू असे आश्वासन देण्यात आले होते. याबाबत भाजपच्या स्थानिक नगरसेविका रंजना पाटील यांनाही नागरिकांनी पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. मात्र पालिका विभाग कार्यालय आणि नगरसेविका गेल्या दोन महिन्यात पाण्याची समस्या सोडवण्यात अपयशी ठरते आहेत. यामुळे एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास के पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा चिटणीस यांनी दिला आहे.

Post Bottom Ad