एचआयव्ही संसर्गमुक्त अभियानात कार्यरत असल्याचा अभिमान - डॉ. रेखा डावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2017

एचआयव्ही संसर्गमुक्त अभियानात कार्यरत असल्याचा अभिमान - डॉ. रेखा डावर

मुंबई, दि. ३० : एचआयव्हीग्रस्त मातांपासून होणाऱ्या अर्भकांना एचआयव्ही होऊ न देणे, म्हणजेच एचआयव्हीमुक्त नवीन पिढी जन्माला आणण्याचे कार्य करत असल्याचा मला अभिमान वाटतो. केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच माझे सहकारी यांच्या सहकार्याने हे कार्य करण्यास यश मिळाले आहे अशा भावना वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी आज व्यक्त केल्या.

एचआयव्हीग्रस्त मातांपासून बालकांना होणा-या एचआयव्हीच्या कार्याची दखल घेत आज राज्य शासनाच्यावतीने आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विशेष पुरस्कार देऊन डॉ. डावर यांचा सन्मान केला. मंत्रालयात जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करून डॉ. डावर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, आरोग्य सेवेचे संचालक डॉ. सतिश पवार, युएसआयडीच्या एचआयव्ही डिव्हीजनच्या भारतातील प्रमुख सेरा हैदारे आदी उपस्थित होते.

डॉ. डावर यांनी गेली ४० वर्षे महाराष्ट्रात स्त्री आरोग्य व वैद्यकीय शिक्षणात भरीव कामगिरी केली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊनही सामाजिक कार्याची जाण असलेल्या डॉ. डावर या भारतातील जनतेच्या सेवेसाठी परतल्या. राज्यात औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी सेवा दिली आहे. कुटुंब नियोजन या शासनाच्या कार्यक्रमातही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. जे.जे. रूग्णालयात त्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

जागतिक एड्स दिनानिमित्त त्या म्हणाल्या, आजच्या तरूण-तरूणींमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी किशोरवयीन पाल्यांना याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात राज्यात आपल्याला एचआयव्ही रूग्ण आढळणार नाहीत. एचआयव्हीचे रूग्ण जेव्हा भारतात आढळून आले त्यावेळच्या परिस्थितीनुसार एक भीतीचे वातावरण पसरले होते. मोठ्या प्रमाणात हा आजार वाढेल असे वाटले होते. मात्र, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या टेस्ट ॲण्ड ट्रीट पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणात आपण या आजारावर नियंत्रण आणू शकलो. शासकीय रूग्णालयात प्रतिबंधात्मक औषधे आणि उपचार मोफत दिली जात असल्याचेही डॉ. डावर यांनी सांगितले.

प्रभावी कार्य - 
१९९९ पासून डॉ. डावर यांनी ‘आईकडून बाळास होणारा एचआयव्ही रोखण्याचा (PMTCT) कार्यक्रम केंद्र प्रशासन (नाको) बरोबर सुरू केला.’ त्यांच्या नेतृत्वाखाली जे.जे.रूग्णालय (PMTCT) साठी ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ म्हणून घोषित करण्यात आले. नवीन पिढीला मातेकडून एड्स होऊ नये यासाठी गेली १८ वर्षे त्या कार्यरत आहेत. आजतागायत त्यांनी १३०० शस्त्रक्रिया केल्या असून, ९५ टक्के यश प्राप्त केले आहे. गेल्या तीन वर्षातील सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून सर्व बालके आज एचआयव्ही मुक्त आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक एड्स निवारण (UNAIDS) यांनीही घेतली. त्या अनेक केंद्रस्तरीय समित्यांवर सक्रीय असून, आईकडून बाळाला होणारा एचआयव्ही फक्त रोखण्यासाठी नाही तर, समूळ नष्ट करण्यासाठी समितीवर प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमातून प्रबोधन करण्यासाठी त्या प्रभाविपणे कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Post Bottom Ad