गुजरात | अजेयकुमार जाधव -
22 वर्षे भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान दहा दिवसावर आले असताना अद्यापही निवडणुकीचे वातावरण या ठिकाणी दिसत नाही. ही वातावरण निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. सोमवारी नरेंद्र मोदी यांनी सकाळी कच्छ येथील आशापुरा मंदिरात दर्शन घेऊन कच्छच्या रंगणातून प्रचाराचे रणशिंग फुंकले.
गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 व 14 डिसेंबर 2017 ला निवडणूक होत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुराळा उडाला होता. राहुल गांधींच्या प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे मोदी प्रचारात कधी उतरणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. कच्छ येथील 1500 वर्ष ऐतिहासिक आशापुरा मंदिरात दर्शन घेऊन मोदींनी भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा केला. मोदींना भेटण्यासाठी खूप गर्दी उसळली होती. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोदींच्या सोमवारी 4 रॅली काढल्या. या रॅली 24 विधानसभा क्षेत्रात निघाल्या. 29 नोव्हेेंबरलाही सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातला मोदींच्या 4 रॅली निघणार आहे. मोदी गुजरात मध्ये 20 सभाही घेणार आहेत.