मुंबई । प्रतिनिधी 5 Nov 2017 -
मुंबईमधील रेल्वेमधील महिला प्रवशांसोबत गेल्या काही महिन्यात अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर महिला प्रवाशांना सुरक्षितता पुरवण्यास रेल्वे आणि पोलीस कमी पडत असल्याची टिका करण्यात आली. यानंतर पश्चिम रेल्वेवर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) महिलांच्या सुरक्षेसाठी ‘आयवॉच वीमेन’ हे नवीन अॅप सुरु केले आहे. चर्चगेट ते विरार पट्ट्यातील महिला प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. आणीबाणीच्या प्रसंगी किंवा एखादी अनुचित घटना घडत असताना या अॅपचा वापर केल्यास पोलिस व जवळच्या नातेवाईकांना संबंधीत महिला प्रवाशांची माहिती पोहचणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांना गुगल प्लेस्टोअर अथवा अॅप स्टोअर्समध्ये जाऊन "आयवॉच वीमेन' अॅप डाऊनलोड करावे लागणार. त्यानंतर युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल. त्याद्वारे रेल्वेकडे प्रवाशाची प्राथमिक माहिती नोंदविली जाईल. त्यात नाव, मोबाइल क्रमांक, नातेवाईकांचा मोबाइल क्रमांक, रक्तगट याची माहिती असेल. महिला प्रवाशांनी आयवॉच वीमेन अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर ही सेवा उपलब्ध होईल. एखादा गंभीर प्रसंग उद्भवल्यास प्रवाशांनी त्यातील आपत्कालीन बटन दाबल्यास आरपीएफ पोलीस नियंत्रण कक्ष आणि जवळच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर त्याची माहिती, मेल पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या अॅपमध्ये माहिती देण्याप्रमाणेच व्हिडीओ आणि ऑडिओ आपोआप रेल्वे सुरक्षा बलाकडे पोहोचेल. त्यामुळे नियंत्रण कक्षाला थेट माहिती हाती लागेल व तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचा संदेश दिला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने लोकल नेमक्या कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे, याची माहिती मिळणार आहे. यामुळे मदतकार्य वेगाने करता येणार आहे. हे अॅप अँड्राइड, आयओएस प्रणालीवरील मोबाइलवर डाऊनलोड करता येईल. ही सेवा निशुल्क असून, रेल्वे हद्दीतून आपत्कालीन बटन दाबले तर त्याची माहिती आरपीएफकडे पोहोचेल व रेल्वेच्या हद्दीबाहेरील मार्गांवर घडल्यास त्याची माहिती नातेवाईकांपर्यंत जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
राजधानीत इको-फ्रेंडली, डिस्पोजेबल टॉवेल्स -
राजधानीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटापोटी जास्त पैसै मोजूनही गाडीत मळलेले टॉवेल्स, उशांचे अस्वच्छ अभ्रे दिली जात असल्याच्या तक्रारी प्रवासी गेले कित्येक महिने करत होते. पश्चिम रेल्वेकडे राजधानीच्या प्रवाशांच्या दर महिन्याला येणाऱ्या तक्रारींपैकी सरासरी पाच तक्रारी या स्वच्छतेबाबत असतात. त्याशिवाय रेल्वेच्या वस्तूंच्या चोरींचाही मोठा प्रश्न आहे. दर महिन्याला सुमारे ७० टॉवेल्सची चोरी होते. या तक्रारींची दखल घेत पश्चिम रेल्वेने यापुढे राजधानीत इको-फ्रेंडली, डिस्पोजेबल टॉवेल्स आणि उशांचे अभ्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. 'हे टॉवेल्स कॉटनचेच आहेत, पण ते बायोडिग्रेडेबल (जैविक विघटन होण्यासारखे) आहेत. असे २३०० उशीचे अभ्रे आणि हात पुसण्याचे नॅपकीन प्रत्येक राऊंड ट्रीपला देण्यात येतात.' या टॉवेल्स आणि अभ्र्यांची किंमतही कमी आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.