मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाकरिता व विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख व्हावी याकरिता दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी पालिका प्रशासनाने निधी देण्याचे मान्य केले आहे. मात्र अनेक शाळांची अवस्था दयनीय आहे. यामुळे ज्या शाळांची दुरुस्ती करण्यात येईल किंवा ज्या शाळा नव्याने बांधण्यात येतात अशा शाळांमध्ये ग्रंथालयाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे केली आहे. खान यांनी केलेल्या मागणीवर येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधनाकरिता अतिरिक्त साहित्याची ओळख व्हावी याकरिता दर्जेदार पुस्तके विकत घेण्याकरिता प्रत्येक शाळेला १८ हजार रुपये देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना बसायला वर्ग उपलबध नाहीत. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांचीही वाणवा आहे. अशा ठिकाणी ग्रंथालयाची सुविधा ही कल्पनाच आहे. यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या अतिरिक्त पुस्तकांची सुविधा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याकरीता महापालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या किंवा दुरुस्त करण्यात येणाऱ्या सर्व शाळांमध्ये ग्रंथालयाकरिता जागा उपलबध करून देण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. जेणेकरून पैशांचा अपव्यय होणार नाही तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त दर्जेदार पुस्तकांचाही लाभ मिळेल असे सईदा खान यांनी पात्रात म्हटले आहे. सईदा खान यांचे पत्र शिक्षण समिती अध्यक्षा गुडेकर यांनी शिक्षण समितीच्या बैठकीपुढे चर्चेला ठेवले आहे. यामुळे शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय होऊन विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ग्रंथालय उपलब्ध होणार आहे.