मुंबई | प्रतिनिधी 16 Nov 2017 -
महाराष्ट्र आणि मुंबईतील भाषा मराठी असली तरी मुंबईत मराठी भाषेचा वापर हवा तसा होताना दिसत नाही. मराठी भाषा सोडून हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने युवा पिढी मराठीपासून दूर जात आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेवून महापालिकेने मुंबईत मराठी विचारधारा सांस्कृतिक केंद्राची स्थापना करावी, अशी ठरावाची सूचना मनसेमधून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी मांडली आहे. या ठरावाच्या सूचनेवर येत्या महापालिका सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा मराठी आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही बहुभाषिक नागरिक वास्तव्य करत आहेत. अनेक भाषा येथे बोलल्या जातात. परंतु, राजभाषा म्हणून मराठी भाषेचा वापर शासकीय व निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालयांमध्ये हवा तसा होत नाही. मुंबई महापालिकेचा संपूर्ण कारभार मराठी भाषेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानिर्णयाची अद्याप शंभर टक्के अंमलबजावणी होताना दिसत नाही. इतर राज्यात मात्र तेथील भाषा बोलण्याची सक्ती केली जाते. येथील मराठी युवा पिढी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ते मातृभाषा मराठी बोलण्यास वारंवार टाळताना दिसतात. पालिकेनेही ही बाब लक्षात घेवून किर्तन, व्याख्यानमाला, काव्यवाचन, कथाकथन ह्यांसारखे सामाजिक, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी मुंबईत मराठी विचारधारा सांस्कृतिक केंद्र उभारावे, जेणेकरुन तरुण पिढीस व्यासपिठ मिळेल व भविष्यात मराठी भाषा चिरकाल टिकून राहण्यास मदत होईल, अशी ठरावाची सुचना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी महासभेच्या पटलावर मांडली आहे. येत्या महासभेत या सूचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही सूचना बहुमताने मंजूर झाल्यास मुंबईत विचारधारा सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.