नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुंडण आणि कँडलमार्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2017

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुंडण आणि कँडलमार्च

मुंबई 8 Nov 2017 - मोदी सरकारने गेल्या वर्षी 8 Nov नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या घटनेला एका वर्ष झाले, नोटाबंदीचा काळात शेकडो लोक रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडले. तसेच अनेक धंदे बंद पडले असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे देशाची विकासबंदी असल्याची टीका करत काँग्रेसने बुधवारी भाजपा सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. दिवसभर काँग्रेसनेत्यांनी निदर्शने, मुंडण आंदोलन आणि कँडलमार्च काढत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस पाळला. 

काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानात नोटाबंदीविरोधात निदर्शने आणि भाजपा सरकारचे श्राद्ध घालण्यात आले. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंडदान करत मुंडणही करून घेतले. नोटाबंदीमुळे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले, जीडीपी घसरला, दहशतवाद वाढला, रोज भारताच्या सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी, अशी भूमिका या वेळी काँग्रेस नेत्यांनी मांडली.

नोटाबंदीच्या काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना काँग्रेसच्या वतीने जुहू चौपाटी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदी लागू करताना सांगितलेला एकही उद्देश सफल झाला नाही. उलट गोरगरिबांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. स्वत:चे पैसे बँकेतून काढताना रांगेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक छोटेमोठे उद्योगधंदे अडचणीत आले. लाखो लोकांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या. विकासदरात प्रचंड घसरण झाली. इतकी वाईट परिस्थिती असतानाही सरकार नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला जल्लोष साजरा करत आहे. भाजपावाले लोकांच्या मृत्यूचा जल्लोष करताहेत की लोकांच्या गेलेल्या नोकऱ्यांचा  असा सवाल करतानाच आजचा दिवस जल्लोष करण्याचा नाही म्हणून काँग्रेस देशभर काळा दिवस पाळत असल्याचे चव्हाण म्हणाले. 

Post Bottom Ad