क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2017

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री


पुणे 16 Nov 2017 - क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे होते. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत होते. त्यांचे उचित स्मारक तर शासन निर्माण करीलच परंतु त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीला माहित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती पुणे यांच्या वतीने संगमवाडी येथे आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, अशोक लोखंडे, विजयराव काळे, कैलास सोनटक्के, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, रायगड, चैत्यभूमी, दीक्षाभूमीला जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व लहुजी साळवे यांच्या स्मारकाला यावे, यासाठी त्यांचे स्मारक उत्तम असे केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना अभिमान वाटेल असे त्यांचे स्मारक होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, वस्ताद लहुजी साळवे यांचे वडील इंग्रजाविरूध्द लढले. इंग्रजांच्या विरूध्दच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. तरीही वस्ताद लहुजी साळवे खचले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक स्वातंत्र्यसेनानी घडले. मात्र त्यांच्या व्यक्तीमत्वावर आणि कार्यावर पुरेसा प्रकाश पडला नाही. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना कळावे यासाठी त्यांचे स्मारक उभारले जाईल. त्यांच्या स्मारकासाठी आवश्यक असणारी जागा आरक्षित केली जाईल.

लहुजी साळवे एका समाजाचे नव्हते ते सर्वांचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा. असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवले जातील. शासन समाजाच्या पाठीशी आहे', त्यांच्या जीवन कार्याची माहिती आजच्या पिढीला होण्यासाठी चित्रपट निर्मिती केली जाईल, त्या चित्रपटात संपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी अशोक लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.

Post Bottom Ad