मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय सकल उत्पादन (जीडीपी) दरातील वाढ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सुधारणेच्या धोरणाचे यश आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होते आहे, शाश्वततेकडे जात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आपल्या या प्रतिक्रियेत म्हणाले, आर्थिक वर्षातील लगतच्या तिमाहीतील भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पादनाचा दर हा 6.3 टक्के इतका घोषित करण्यात आला आहे. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सुधारणाच्या धोरणाचे यश सिद्ध झाले आहे. निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कर यांसह विविध आर्धिक सुधारणांची मालिकाच राबविण्यात आली. याला बाजारपेठेतूनही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे या राष्ट्रीय सकल उत्पादनातील वृद्धीदरावरून स्पष्ट होते आहे.
भारताची आर्थिक स्थिती खालावते आहे,या आरोपांनाही या वृद्धीदराद्वारे उत्तर मिळाले आहे. एकीकडे जागतिक बँकेने इज ऑफ डुईंग बिझनेसवरून भारताचे जागतिक स्तरावरील स्थान उंचावल्याचे जाहीर केले. मुडीज या वित्तीय मानांकन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने चौदा वर्षांनंतर देशाच्या पत मानांकनातही वाढ झाल्याचे जाहीर केले आहे, आणि आता राष्ट्रीय सकल उत्पादन दरातही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून भारताची आर्थिक स्थिती सदृढ होते आहे व ती शाश्वततेकडे जात असल्याचे सिद्ध झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.