मुंबई / मुकेश धावडे / 23 Nov -
तिकीट तपासनीस असल्याचं भासवून रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या बोगस टीसीची सात दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील जीटीबी नगर रेल्वे स्थानकात शनिवारी या बोगस टीसीला जीआरपी पोलिसांनी अटक केली होती. तपासानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी दिली.
शनिवारी 18 नोव्हेंबरला हार्बर मार्गावरील जीटीबी नगर रेल्वे स्थानकातील फलाट क्र. 1 व 2 वर रेल्वेचे तिकीट तपासणीस पी.सी. जगदीशकृष्ण तिकीट तपासणीचे काम करत होते. याचवेळी त्यांना बोगस टीसी आकाश गुप्ता एका प्रवाश्याकडील तिकीट तपासनी करताना दिसला. त्याच्याकडे पाहून तो या हद्दीतील टीसी नाही हे जगदीशकृष्ण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गुप्ताला टीसी असल्याचे ओळखपत्र दाखव अशी मागणी केली असता आपल्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही असे उत्तर गुप्ताने दिले. त्यामुळे जगदिशकृष्ण यांचा संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना या बोगस टीसीबाबत माहिती दिली. त्यानुसार वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष तिकीट तपासनीस टिमच्या उपस्थितीत या बोगस टीसीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी चौकशी केली असता बोगस टीसी आकाश गुप्ता याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो कुर्ला हलाव पूल येथे राहणारा आहे. त्याने प्रथमच अशा प्रकारचा गुन्हा केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरोधात रेल्वे कायद्यांतर्गत कलम 170, 171 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडील टीसी सारखा असणारा पोशाखही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. व्हि. पवार करीत आहेत.