मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
स्मशानभूमीत प्रेताचे दहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. हे वायुप्रदूषण रोखण्यासाठी पालिका ‘वॉटर स्क्रबर’ यंत्रणा उभारणार आहे. यामुळे स्मशानात निर्माण होणार्या वायूप्रदुषणावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. यासाठी स्मशाभूमीत असणारे पोलादी छप्पर आणि धुरांडे काढून टाकण्यात येणार आहे.
मुंबईत विद्युत दाहिनी सुरू झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने मृतात्म्यांचे दहन केले जाते. यामध्ये दहनासाठी जळाऊ लाकडे वापरण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होते. शिवाय मृतदेहाच्या ज्वलनानंतर सल्फरडायऑक्साइडसारखे मानवी आरोग्याला घातक वायू बाहेर पडतात. शिवाय मृतदेहाच्या ज्वलनानंतर परिसरात दुर्गंधीही पसरली जाते. या पार्श्वभूमीवर ‘वॉटर स्क्रबर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. के-पूर्व विभागातील जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर स्मशानभूमीत प्रथम ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने लाकडांच्या सहाय्याने मृतदेहाचे दहन केले जाते. याठिकाणी एकूण चार पायर्स असून तेथे रोज ३ ते ४ मृतदेहांचे दहन केले जाते. यामुळे परिसरात पसरणार्या सल्फरडायऑक्साइडसारख्या वायूंमुळे रहिवाशांना दमा आणि श्वसनाच्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ‘वॉटर स्क्रबर’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चितेतून निघणारा धूर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेल्या निर्देशानुसार यंत्रणा राबवून हवेत सोडण्यात येणार असल्यामुळे वायुप्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.